Categories: कृषी प्रशासकीय बातम्या

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास होणार ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाई

कोल्हापूर | अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी कोवाड येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील शेत पिकांचे नुकसान, सुरु असणारे पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, जिल्ह्यामध्ये सुरु असणारे पंचनामे ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा. पंचनाम्यामधून कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्या, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर ही जबाबदारी राहील, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पंचनाम्यासाठी ज्या गावात जाणार आहेत, त्याबाबत ग्रामस्थांना आदल्यादिवशी याची माहिती दवंडी देवून कळवावी. पंचनामा करण्यात येणार असल्याबाबतचा संदेशही एक दिवस आधी पाठवावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही पंचनाम्याबाबत तहसिलदार, गट विकास अधिकारी यांना संपर्क करुन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात राज्य शासन तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत आहे. लवकरात लवकर मदत दिली जाईल. वादळीवारे, अतिवृष्टीमुळे शेतात पडलेला ऊस आधी गाळपाला गेला पाहिजे, त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही पाठवावे, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी केल्या.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Flood 2020