पुणे। गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींचा, राज्य शासनाचा पुणे जिल्ह्यातील प्रशासनावर असलेला कंट्रोल सुटला की काय असे म्हणण्याइतपत परिस्थिती उद्भवलेली आहे. दररोज विविध अधिकारी एकाच विषयावर अनेक आदेश काढत असल्यामुळे प्रचंड गोंधळाचे आणि अनागोंदीचे वातावरण तयार झाले आहे. स्थलांतरित कामगार आणि नागरिकांना आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठीची प्रक्रिया ठोसपणे पार पाडण्यात पुणे जिल्हा प्रशासन कमी पडतंय हे आता स्पष्ट झालं आहे. सुरुवातीला हेल्पलाइन, मग तहसीलदारांचे ईमेल व ऑनलाईन फॉर्म, पोलिसांकडील ऑनलाइन फॉर्म आणि आता पोलिसांकडील ऑफलाईन फॉर्म अशी सातत्याने नवीन रचना करत असल्यामुळे नक्की नागरिकांनी काय करायचं याबाबत गोंधळ उडाला आहे.
त्याचबरोबर स्थलांतरित कामगारांसाठी, पुण्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या लोकांसाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट हे कोणी द्यायचे, कशा स्वरूपामध्ये द्यायचे, खाजगी डॉक्टर सर्टिफिकेट देताना भरमसाठ पैसे उकळत आहेत, त्याबाबत प्रशासनाची भूमिका काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिलेली आहेत. गोंधळाच्या वातावरणातच ही प्रक्रिया पुढे जात आहे. पुणे मनपाची अनेक रुग्णालये हे मेडिकल सर्टिफिकेट द्यायला नकार देत आहेत. अनेक कामगारांना ससून हॉस्पिटलमध्ये जायला सांगत आहेत. याबाबत तातडीने पुणे मनपा प्रशासनावर कारवाई व्हायला हवी.
हीच परिस्थिती कमीजास्त फरकाने कुठली दुकाने कोणत्या वेळी सुरू करायची याबाबत दिसून येते. त्याच्यामुळे दुकानदार, व्यापारी यांच्यामध्ये पूर्णपणे गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. याशिवाय दारूच्या दुकानांना दिलेली परवानगी आणि त्याच्यामुळे लॉक डाऊनचा उडालेला फज्जा हेही सर्व पुणेकरांनी अनुभवलेले आहे.
हे सर्व असताना पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार हे कुठे आहेत असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. दादांची प्रशासनावर असणारी पकड सर्वश्रुत आहे, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रशासकीय अनागोंदी पाहता माननीय अजित दादा पवार यांचे पालकमंत्री या नात्याने पुणे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटण्याजोगी परिस्थिती तयार झाली आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. त्यांच्यावर अधिक जबाबदारी आहे, परंतु पुणे हा कोरोनाच्या साथीतील महत्वाचा हॉटस्पॉट असल्यामुळे इथे पालकमंत्री या नात्याने त्यांनी ठाण मांडून अधिक लक्ष घालण्याची गरज आहे.
या सर्व परिस्थितीत आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ता, डॉ. अभिजीत मोरे यांनी अशी मागणी केली आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये तयार झालेली ही प्रशासकीय अनागोंदीची परिस्थिती कमी करून लवकरात लवकर प्रशासनावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आदेश आणि लोकांना असलेल्या सूचना या सुस्पष्ट असायला हव्यात. एका दिवशी एकाच विषयावर गोंधळ वाढवणारे अनेक प्रशासकीय आदेश निघणे बंद व्हायला हवे. पुणे जिल्ह्यामध्ये एकाच यंत्रणेमार्फत स्पष्ट आदेश आणि प्रशासकीय भूमिका ही व्यक्त केली गेली पाहिजे अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे. दिवसातून एकदा विविध प्रशासकीय निर्णयांची माहिती समन्वय अधिकाऱ्यानी माध्यमांना द्यावी व शंका निरसन करावे. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने अनेक नागरिक ससूनला जायला घाबरतात तरी पुणे मनपाच्या सर्व दवाखान्यात मेडिकल सर्टिफिकेट देण्याची सुविधा तातडीने सुरु केली जावी. त्याचबरोबर आम आदमी पार्टी माननीय पालकमंत्री अजित दादा पवार यांना विनंती करते की त्यांनी पुण्याकडे अधिक वेळ लक्ष देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे. तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनचा उडालेला फज्जा यामुळे कोरोनाचा संसर्ग अजून जास्त वेगाने पुण्यात होणार नाही यासाठी तातडीने खबरदारी घ्यावी.