Categories: Featured

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते साहित्य वाटपाचा अट्टाहास, दिव्यांगाचे साहित्य वर्षभर धूळखात पडून

कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातल्या १५ हजार दिव्यांग नागरिकांना वाटप होणारे साहित्य गेले वर्षभर पडून आहे. दिव्यांगाना त्यांच्या आयुष्यात आधार ठरणारे हे साहित्य केवळ केंद्रीय मंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ  नसल्याचे कारण सांगून वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे केवळ श्रेय घ्यायचे म्हणून दिव्यांग नागरिकांचे साहित्य वर्षभर वाटप न करणे हा दिव्यांगांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असल्याची चर्चा आता सुरू झालीय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात अशा पद्धतीने दिव्यांगांना वाटप होणारं साहित्य पडून आहे. गेली वर्षभर जिल्ह्यातील १५ हजार दिव्यांग नागरिक या साहित्याच्या प्रतिक्षेत आहेत. पण हे साहित्य काही केल्या दिव्यांगांपर्यंत पोहचलेले नाही. केवळ केंद्रीय मंत्र्यांना हे साहित्य वाटप करण्याचे श्रेय मिळावे यासाठी त्यांनी राज्यातल्या कुठल्याही नेत्याला साहित्य वाटप करू दिले नसल्याचीही चर्चा आहे. या साहित्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल एक दोन नव्हे तर नऊ कोटींचा निधी खर्च केला आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी साहित्य वाटपाबाबत केंद्राकडे अनेकवेळा पत्र व्यवहार केलाय… पण मंत्रीच उपस्थित नसल्याचं कारण मिळत असल्याने हे साहित्य अद्याप वाटप करण्यात आलेलं नसल्याचे दीपक घाटे या अधिकाऱ्यांनी सांगितलय.

एकूण ३५ प्रकारचे साहित्य केंद्राकडून मंजूर झालं असून, त्यापैकी जास्त संख्या असलेलं ४ प्रकारचे साहित्य आलेलं आहे. यामध्ये तीन चाकी सायकल, व्हील चेअर, कर्णबधिरांचे किट, अंध नागरिकांचे किट याचा समावेश आहे. तर उर्वरित साहित्य केंद्राकडून येणं बाकी आहे. जे साहित्य आलयं ते जोडणीसाठी किमान १० दिवस लागणार आहेत.  परंतु वर्षभर पडून असलेले हे साहित्य आता सुस्थितीत असेल की नाही याबाबतीत देखील साशंकता निर्माण होत आहे. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेल्या या प्रकाराबाबत जिल्ह्यात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

Team Lokshahi News