Categories: Featured राजकीय

हसन मुश्रीफांच्या गुगलीने समरजीत घाटगे राजकीय धर्मसंकटात..!

कागल | राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत मुरगूड तलावाच्या पाण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी समरजीत घाटगे यांच्यावर गुगली टाकली आहे. यातून पुन्हा एकदा मुश्रीफांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले आहे. तसेच तालुक्‍यातील हक्काच्या पाण्याच्या एका थेंबावरही अन्याय होणार नसेल, आणि ही योजना ते आमच्या हद्दीच्या बाहेर करणार असतील तरच आम्ही इचलकरंजीकरांचा पाणीप्रश्न समजावून घेऊ, असे मत ही व्यक्त केले आहे. नगरपरिषदेतर्फे नगरोत्थान महाअभियानमधून ९ कोटींच्या मुरगूड शहर सुधारीत नळ-पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले,  आज गुरुपौर्णिमेदिवशीच माझ्या गुरूच्या गावात हा कार्यक्रम होत आहे हा सुवर्णयोग आहे. माझे गुरु स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ज्याच्यासाठी अट्टाहास केला, तो सोडायचा नाही एवढीच माझी भूमिका आहे. हा तलाव राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मुरगूड, यमगे आणि शिंदेवाडीच्या लोकांसाठी बांधलेला असेल आणि त्यातून पिण्याच्या पाण्याचा पहिला सार्वजनिक नळ मुरगूडात आणून सोडला असेल, तर राजर्षी शाहू महाराजांची कल्पना स्वच्छ होती की, या तलावाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व्हावा.  समरजित घाटगे यांनी तलावातील स्वच्छ पाणी पिढ्यानपिढ्या मुरगुडसह यमगे आणि शिंदेवाडी ग्रामस्थांसाठी द्यावं. त्याबदल्यात समरजीत  घाटगेंना शासन शेतीच्या पाण्यासाठी  वेदगंगा नदीवरून  जॅकवेल व ठिबक सिंचन मोफत करून देईल.

इचलकरंजीकरांच्या स्वच्छ पाण्याच्या हक्कासह कागल तालुक्यातील जनतेच्या पाणी हक्काचे संरक्षण याबाबत बोलताना ते म्हणाले कि, आज इचलकरंजीकरांनी संजय मंडलिक यांना निवेदन दिले आहे. त्यात “स्वच्छ पाणी पिण्याचा आमचा अधिकार आहे की नाही? आमच्या अनेक पिढ्या प्रदूषित पाणी पिताहेत, पुढच्या ही पिणार आहेत. असे म्हटले आहे.” यामुळे मी ही अस्वस्थ झालो.” इचलकरंजीकरांच्या पाणी प्रश्नाबाबत मी, खासदार संजय मंडलिक, संजय घाटगे, के. पी. पाटील यांच्यासह सर्वच जण एकत्रित बसून त्यावर निर्णय घेऊ.” 

  • मंत्री मुश्रीफ यांनी राजकीय मुत्सदेगिरीची दर्शन घडवत समरजित घाटगेंवर टाकलेल्या या गुगलीवर घाटगेंकडून कसे प्रत्युतर दिले जाते हे पहावं लागणार आहे.

यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, “भविष्यातील वाढते शहरीकरण लक्षात घेऊन शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव या तलावावरील पिण्याच्या पाण्याचा हक्क अबाधित ठेवून, ही सुधारीत नळ पाणीपुरवठा योजना येत्या काही महिन्यात कार्यान्वित होणार आहे. तलाव मालकांनी शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमास कार्यकारी अभियंता डी. के. महाजन, उपअभियंता एस. व्ही. जवळेकर, उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, पक्षप्रतोद नामदेव मेंडके, विश्वास कुराडे, शामराव घाटगे, आर. डी. पाटील, विजय भोसले, विकास पाटील, जयसिंग भोसले, मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kagal politics