Categories: Featured

रागाच्या भरात ‘त्याने’ पेटवले पोलिस निरिक्षकाचे घर, गारगोटीतील प्रकाराने खळबळ

कोल्हापूर। गारगोटी येथील पोलीस कर्मचारी निवासस्थानातील अतिक्रमण काढल्याच्या रागातून पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या खासगी वाहनासह त्यांचे राहते घर पेटविण्याचा प्रकार घडला.  यात वाहन जळून खाक झाले तर घराचे किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाआहे. याप्रकरणी संशयित सुभाष देसाई यास ताब्यात घेतले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, भुदरगड येथील पोलिस निवासस्थानाच्या हद्दीत सुभाष देसाई याने अतिक्रमण केलेला दुकानगाळा  काढला होता. ते अतिक्रमण पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी काढले. त्याचा राग मनात ठेवून सुभाष देसाई याने पतंगे यांना धडा शिकवण्याचा बेत बोलून दाखवला होता. त्यावेळेपासून त्याने रॉकेलचा कॅन आणून ठेवला होता. मंगळवारी  मध्यरात्री त्याने पतंगे यांच्या निवासस्थानासमोरील वाहनावर रॉकेल ओतून पेटवली. बाहेरील आवाज ऐकून पतंगे यांनी बाहेर येऊन सुभाष देसाई यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

या घटनेत पतंगे यांचे वाहन जळून खाक झाल्याने फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. तर घराच्या हाॅलच्या काचा फूटून ज्वाला आत गेल्याने संपूर्ण हॉलमधील साहित्यास आगीच्या झळा लागून नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर गस्तीवरून परत गेल्यानंतर काही मिनिटाच्या आत ही  घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर, स्थानिक गुन्हा अन्वेषण निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक उदय डुबल यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा गारगोटीत दाखल झाला. दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास महागाव (ता. गडहिंग्लज) येथे सुभाष देसाई यास बहिणीच्या घरी ताब्यात घेतले असल्याची माहिती श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे.

Team Lokshahi News