Categories: Featured राजकीय

म्हटलं.. साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते, तर निदान आपण चार वेळा उपमुख्यमंत्री तरी होऊ…!

पुणे। कसं का असेना मी चार वेळेस उपमुख्यमंत्रीपद भुषवले आहे. साहेब चारवेळा मुख्यमंत्री होते, म्हणून आपण पण म्हणलं चला निदान चारवेळा उपमुख्यमंत्री तरी होऊ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काही काळातील राजकीय नाट्यांचा उलगडा केला. बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान त्यांनी अशा अनेक वक्तव्यांनी बारामतीकरांना मनमुराद हसवलं.

“आम्ही पण चार चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले. कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना, माझ्या पध्दतीने झालो असेल. पण गंमतीचा भाग जाऊ द्या, म्हटलं, साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते, चला आपण पण चार वेळा उपमुख्यमंत्री झालो”, असं म्हणून अजित पवारांनी काही वेळ पॉझ घेतला आणि उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला.

यावेळी अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याला केलेल्या मदतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. “जर माळेगाव कारखान्याने जिल्हा बँकेऐवजी इतर बँक निवडली असती तर अधिकचे व्याज भरावे लागले असते आणि त्याचा भुर्दंड साहजिकच सभासदांवर आला असता, म्हणूनच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मी संबंधितांना फोन करून तजवीज केली. वास्तविक पाहता राज्यात जे सरकार होते, ते लोकांनी निवडून दिले होते. त्यांच्याकडे सहकारमंत्रीपद होते. मात्र त्यांनी राजकारण केले”, असं पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. तर नुकतेच काही महिन्यांपूर्वी बंड करत भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर भाजपसोबत काडीमोड घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Lokshahi News