अहमदनगर | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना अँटीजन तपासणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाचा कोणताही धोका नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे. पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सहा पोलिसांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यामुळे पवार यांची ब्रीच कॅंडी रूग्णालयात अँटीजन तपासणी करण्यात आली होती. त्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरात काम करणारे आणि त्यांची सुरक्षा करणारे कोरोनाबाधीत आढळल्याने हे लोकं ज्या ठिकाणी राहतात, तेथील नागरिकांचीही अँटीजन तपासणी करण्यात येत आहे. कोरोना काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंगसाठी दूर करत असताना कदाचित त्यांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोना झाला असावा असा अंदाज आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांची देखील माहिती गोळा करून चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
चार दिवस कुणालाही भेटणार नाहीत शरद पवार –
शरद पवार हे देशातील तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे व्यक्तीमत्व असून त्यांच्या सुरक्षेतील सहा जणांना करोना संसर्ग झाल्याने तातडीने अनेक पावले उचलण्यात आली आहेत. पुढचे काही दिवस कोणताही दौरा न करण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनीही पुढील चार दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पवार साहेब आवश्यक असेलेली सर्व काळजी घेत आहेत. चिंतेचं कोणतंही कारण नाही’, असेही टोपे यांनी नमूद केले.