Categories: आरोग्य सामाजिक

कोरोनाबाधित १५ रुग्णांची प्रकृती सुधारली, लवकरच डिस्चार्ज – आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई। कोरोना आजारावर मात करता येत असल्याचे आत्तापर्यंत सिध्द झालं आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी १५ रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारत आहे ही समाधानाची बाब असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी, संचारबंदी दरम्यान वैद्यकीय सेवेवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहन केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील काही डॉक्टरांनी आपल्या ओपीडी बंद केल्या आहेत. ओपीडी बंद करणे हे योग्य नाही. त्यामुळे आजारी लोकांचे हाल होईल असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना ओपीडी सुरु ठेवून रुग्णांवर उपचार करा, अशी विनंती केली.

तसंच, आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत काळजी घेण्याचे आवाहन केले. नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार’ असा संकल्प सर्वांनी करा, असे देखील त्यांनी जनतेला सांगितले आहे. 

Team Lokshahi News