Categories: Featured

‘कोरोना वॉर्ड’ची ड्युटी करताना ‘तिचा’ अनुभव… वेळ काढून फक्त एकदा वाचा!

सर्व भारतीय नागरिकांना नमस्कार व कळकळीची विनंती, सरकारी आदेशानुसार कृपया कुणीही घराबाहेर पडू नये.
“कोरोना वॉर्ड ची ड्युटी करताना चा माझा अनुभव शेअर करतेय, वेळ काढून वाचा”

कोरोना वॉर्ड ची ड्युटी करायला मी खूप उत्सुक होते, पेशंट सेवा हिच खरी ईश्वर सेवा, असे म्हणत मी गेली २५ वर्षे हॉस्पिटल ड्युटी करत आहे. स्वाईन फ्ल्यू च्या काळातही निडरपणे पेशंटची पुरेपूर काळजी घेतली. HIV /Hbsag /cancer /TB चे पेशंट कोणत्याही आजाराचे पेशंट असो कधीही ग्लोव्हज-मास्क चा वापर केला नाही, पण.. पण आज त्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रोटेक्टीव्ह किट घालावी लागली. (माझ्यामुळे हा आजार इतरांना पसरू नये म्हणून) हा ड्रेस परिधान केल्यावरचा जो अनुभव होता, तो खुपच भयानक होता. गॉगल, डबल मास्क, तसेच शुजकव्हर… हे सगळं खुपच अनकम्फर्रटेबल वाटत होतं. चष्म्यावर गॉगल तो ही कानामागे टोचत होता, शुजकव्हर चे इलास्टीक सारखे खाली खाली सरकत होतं, चालताना अडखळत होते, डबल मास्क मुळे श्वास घेण्यास ही त्रास होत होता. धावपळ करुन घामनेच आंघोळ होत होती. तसेच मला cervical spondylitis चा त्रास असून मानेचा पट्टा लावून ड्युटी करावी लागते, पण या कीट मुळे मानेचा पट्टा हि लावता आला नाही, त्यामुळे मानदुखीचा त्रास ही सहन करावा लागला. तो वेगळाच.

शिवाय ९ पैकी ४ कोवीड -१९ पॉझीटीव्ह पेशंट होते. काही ना काही कारणाने सारखे त्यांच्या रूममध्ये जावे लागत होते, कधी इंजेक्शन -मेडिसिन द्यायला, तर कधी ब्लड सँपल, इंट्ररा कॅथ, कधी सलाईन संपले तर चेंज करायला, डॉक्टरांच्या राऊंडला, कधी पेशंटचे घशाचे व नाकातील स्वाब घ्यायला (डॉक्टरांसोबत) कधी जेवणाची, पाण्याची व्यवस्था आहे की नाही ते पहायला, तर कधी आॉक्सीजन लावायला.
पाणी प्यायची इच्छा झाली तर पाणी ही पिता आले नाही, वॉशरुम ला जायचे होते पण तिथेही जाता आले नाही, पूर्ण ८ तास ( ड्युटी संपेस्तोवर), कारण प्रोटेक्टीव्ह किट देताना, आम्हाला सांगण्यात आलं होतं की कीट जपून वापरा, व सारखे सारखे काढ-घाल केल्याने इंन्फेशन चे चांसेस वाढतील.

तसेच विना चहा-पाणी धावपळ करतांना डोळ्यासमोर सतत परीवार उभा राहत होता, मनात एक भिती ही वाटत होती की, आपल्यामुळे आपल्या मुलाबाळांना संसर्ग (infection) झाला तर, हा विचार करून डोकं अगदी सुन्न होते. सगळ्या जगाची अवस्था काय झाली आहे हे आपण पाहतो आहेच, तेथील डॉक्टर -सिस्टर यांचीही अवस्था आपणास अवगत आहेच. आणि बरेच अनुभव सांगण्यासारखे आहेच, पण ….थांबवते

तरीही स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, आम्ही सर्व हॉस्पीटल कर्मचारी तुमच्या साठी सदैव तत्पर आहोत, इथून पुढे आमची २४ तास ड्युटी ही लागण्याची शक्यता आहे. आणि आम्ही ती ही करू तुमच्या साठी, पण… पण तुम्ही ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, सरकार ज्या सूचना देतयं त्याप्रमाणेच तुम्ही वागले पाहिजे, आज आणि आत्तापासून कुणीही घराबाहेर पडता कामा नये, साबण -पाणी, मास्क याचा वेळोवेळी उपयोग करा. हे सगळे “तुमचा अनमोल जीव वाचवण्यासाठी” चाललयं हे लक्षात घ्या.

अशावेळी सेवाभावी संस्थांनी, उद्योगपतींनी, जहागिरदार लोकांनी पुढे येऊन हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपयोगी वस्तूंचा – साहित्याचा पुरवठा केला पाहिजे. असे मला वाटते.
।। जीवो जीवस्य जीवनम।।
“प्रत्येक जीव दुसऱ्या अनेक जीवांवर स्वतः च्या अस्तित्वासठी निर्भर असतो”

सिस्टर सौ. सुवर्णा नाझरेकर, Pcmc hospital, pune (25 March2020)

Team Lokshahi News