Categories: क्रीडा महिला

भात शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्णपदकांची कमाई

झेक प्रजासत्ताक।१५ जुलै। भारतातील एका शेतकऱ्याच्या पोरीने झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल ३ सुवर्णपदकाची कमाई करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारताची सुपरस्टार धावपटू अर्था हिमा दास हीच ती शेतकऱ्यांची पोर असून तिने गेल्या ११ दिवसात धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकांची लयलूट करून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्जवल केले आहे.

भारताची सुपरस्टार धावपटू असलेल्या हिमाने मागील वर्षी २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. वयाच्या १८व्या वर्षीच भारताला तिने हे पदक मिळवून दिले आहे. पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर तिने  एप्रिल २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ मध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

सध्या हिमाला आरोग्याच्या बाबतीत मोठा संघर्ष करावा लागत आहे. ती सध्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त असून यावर मात करत तिने २३.६५ सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने २३.९७ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

कोण आहे हिमा दास?

हिमा दास ही आसामची असून तिचा जन्म ९ जानेवारी २००० रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. तिचे जन्मगाव कांधूलिमारी असून तिचे वडील रोनजीत दास भाताची शेती करतात. तर तिची आई जोमाली दास गृहिणी आहे. हिमाच्या कुटूंबात एकूण १६ सदस्य असून घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे. त्यामुळे घरखर्च भागवण्यास सुध्दा हिमाच्या कुटूंबाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. घरच्या याच गरिब परिस्थितीमुळे हिमाला आपले शालेय शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले आहे.

हिमाला शालेय जिवनापासून खेळाची आवड असल्याने ती शाळेत असताना मुलांसोबत फुटबॉल खेळत असे. तिच्यातील खेळाची आवड ध्यानात घेऊन जवाहर नवोदय विद्यालयाचे पीटी टीचर शमशुल हक यांनी तिला धावपट्टू बनण्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर तिने लगेचच जिल्हास्तरीय स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकून शमशुल हक यांचा निर्णय सार्थ ठरवला. 

शालेय जिवनापासून सुवर्णपदकांच्या कमाईचा हिमाचा प्रवास आजही सुरू असून तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील आपला धडाका कायम ठेवला आहे. सध्या सुरू असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत तर तिने चक्क ३ सुवर्णपदकांची कमाई करून भारताबरोबर आपल्या शेतकरी आईबाबांचे देखील नाव उज्जवल केले आहे.  

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: himadas हिमा दास