Categories: Featured राजकीय

शेतकऱ्यांना लुटून बरबाद करणारे महाशय मोदी शिवाजी महाराज कसे? – बच्चू कडू

मुंबई‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. “पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले, तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी त्यांना करता येणार नाही,” अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा प्रहार केलाय. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. सात जन्म नाही. सात पिढ्या नाही, तर अख्ख आयुष्य झिजवलं, तरी मोदींची तुलना छत्रपतींशी करू शकत नाही. छत्रपतींच्या आयुष्यातील एका प्रसंगासारखा देखील संघर्ष मोदींनी केलेला नाही. 

शिवाजी महाराज होणं फार दूरची गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या काडीच्या देठाला हात लावू नका, म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडं अख्खा शेतकरी लुटून बरबाद करणारे महाशय मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही,” अशी घणाघाती टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. असे तुलनात्मक पुस्तक काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही बच्चू कडू यांनी केलीय. 

दरम्यान पुस्तकावर वाद निर्माण झाल्यानंतर पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी आपली भूमिका मांडली असून अशी तुलना करण्यात काहीही गैर नसल्याचे म्हणटले आहे.  “शिवाजी महाराज ज्याप्रमाणे प्रत्येकाची, राज्यातील माता, बहिणींची चिंता करायचे तसंच मोदी देशातील माता, बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. आज प्रत्येक महिलेला आपण सक्षम असल्याचं वाटत आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे, त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात भारताचा सन्मान वाढला आहे.”

Team Lokshahi News