Categories: राजकीय सामाजिक हुणार तरास, पण गुणं हमखास..

संविधानाला ‘नखे’ लावणारेच देशभक्त कसे?

– स्नेहल शंकर

प्रवीण तरडे नावाचं एक उच्चभ्रू प्रस्थ आहे. त्यांनी मराठी सिनेसृष्टीत ‘मोलाचं योगदान’ दिल्याचं ऐकिवात आहे. सोबतच संघाच्या वर्तुळात त्यांचा वावर असतो. आज गणेशोत्सवानिमित्त या महाशयांनी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाच सार असणाऱ्या राज्यघटनेवर केली. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. तरडेंनी केलेल्या चुकीमुळे ते ट्रोल झाले सोबतच लोकांनी अक्षरशः त्याच्या अकलेचे तारे तोडले. त्यानंतर या महाशयांनी या चुकीबद्दल फक्त दलित वर्गाची माफी मागितली. म्हणजे तरडे नामक या सद्गृहस्थाने हा प्रकार सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने केला आहे का? की समाजात तेढ निर्माण करण्याचा त्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असावा? यासाठी केलेला हा लेखप्रपंच.

भारतातल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य म्हणजे येथे धर्म, प्रांत, जात, भाषा, व्यक्ती याहून सर्वोच्च असणारी आपली राज्यघटना. घटनेच्या उद्देशिकेत भारताचं वर्णन ‘सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य’ असं करण्यात आलंय. म्हणजेच आपल्या देशाची जी कार्यपद्धती आहे ती घटनेने घालून दिल्याप्रमाणे आहे. पाश्चात्त्य देशांमधील तत्ववेत्यांनी मांडलेल्या पुस्तकी संकल्पनेप्रमाणे भारतातील धर्मनिरपेक्षता नाही. त्यामुळेच घटनानिर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात घटनाकारांना हा देश बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुभाषिक असल्यानं ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द उद्देशिकेत घालण्याची गरज वाटली नव्हती. त्यातूनच आपली एतद्देशीय धर्मनिरपेक्षता साकारली गेली होती. मात्र, १९७६ साली इंदिरा गांधींना घटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द टाकावा लागला आणि त्याला कारण ही तसेच होते. तत्कालीन परिस्थितीत उदारमतवादी भारतीय परंपरेची मूल्य मागे पडून धर्मांधता-जातीयवाद भारतीय समाजात शिरजोर होऊ लागली होती. भारतीय संविधानात मांडलेल्या आणि अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्षतेची प्रचिती देशात स्वातंत्र्यानंतर आलीच नाही. याउलट हिंदुत्ववादाचा विखारी प्रचार करण्यास सुरवात झाली होती.

किंबहुना स्वातंत्र्यापासून ते आजअखेर हिंदुत्ववाद्यांनी त्यांना सोयीचा ठरेल अशाप्रकारे इतिहासाची मांडणी, हिंदु पुरूषार्थाचा ऐतिहासिक अभिनिवेश, भारताऐवजी ‘हिंदू राष्ट्र’ स्थापण्याची महत्वाकांक्षा वाढीसच लावली. आज भारतात गांधी, नेहरू आणि स्वातंत्र्यलढ्यातील दिग्गजांनी तसंच घटनेच्या शिल्पकारांनी दिलेल्या वारश्याचे अवशेष उरल्याचे सर्वार्थाने जाणवते. आणि याची जाणीव होते जेव्हा प्रवीण तरडेसारखे मूढ लोक स्वतःची हिंदुत्ववादी नखे देशाच्या संविधानाला लावतात. सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे विनाअडथळा धर्माचरण करता येण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या संविधानावर एका विशिष्ट धर्माकडून पुजल्या जाणाऱ्या देवतेची स्थापना करणं निंदनीय आहे. भारतातील लोक, खासकरून काही हिंदू हे, ज्याला ‘आपला’ म्हणता येईल अशा राष्ट्राच्या शोधात आहेत. हे लोक एका अशा नागरीसंस्कृतीचे भाग आहेत, जिच्या वैभवानं डोळे दिपावेत आणि ज्यातील विषमतेनं काळजाला पीळ पडावा. हीच नस पकडत तरडेंनी बुद्धिदेवतेची स्थापना संविधानावर केली. याप्रकरणी जर तरडेंनी चूक केल्याचे कोणी त्यांच्या निदर्शनास आणून देत असेल तर तरडेंनी त्या व्यक्तीला भारतीय समजूनच समस्त भारतवासीयांची माफी मागणे अपेक्षित होते. मात्र तरडेंनी तसे न करता दलित समाजाची माफी मागितली. संविधान हे एका समाजासाठी नसून ते अवघ्या भारतवर्षाचे आहे याची जाणीव तरडेंना नव्हती असे म्हणता येणारच नाही. गणपती हि देवता फक्त एका धर्माशी निगडित असल्याने इतर धर्मातील लोकांना या देवतेविषयी प्रेम असण्याचे कारण नाही. त्यामुळे जर या गोष्टीला विरोध झालाच तर हिंदुत्ववादाच्या लाटेवरस्वार झालेले बहुसंख्याक लोक त्यांच्या मदतीला धावतील हे निश्चितच. त्यांनी केलेला स्टंट हा क्रिएटेड प्लॉट वाटतो कारण वर उल्लेखल्या प्रमाणे ते अभिनय क्षेत्रातील बडे प्रस्थ आहेत.

एखादा वाद मिटवायचा असेल वा माफी मागायची असेल तर त्यात विनम्रता असावी हे तरडेसारख्या अभिनेत्याला कळू नये म्हणजे असंवेदनशीलतेचा कळसच म्हणता येईल. माफीनाफ्याचा रेकॉर्डेड व्हिडीओ टाकताना फक्त दलित बांधवांची माफी मागितली. यातून माफीनामा कमी तर संविधान हे फक्त दलितांशी निगडित असल्याचे बिंबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न वाटतो. यावेळी त्याला आपण एक भारतीय आहोत आणि आपणच आपल्या संविधानाचा अपमान केल्याची जाणीव होत नाही हे खेदजनक आहे. तरडे ज्या संघाशी जोडला गेला आहे त्या संघातील अनेक लोक संविधानाचा पदोपदी अपमान करत असतात. किंबहुना त्यांच्या या मातृसंघटनेतच संविधानाला नाकारून हिंदुत्ववाद भक्कम करण्याचे बीज आढळून येते. या मातृ संघटनेशी निगडित असणाऱ्या व देशात सर्वोच्च स्थानी बसलेल्या नेत्याने ‘स्वातंत्र्यदिना’ वेळी देशाला हिंदुस्थान संबोधित करणे म्हणजे जाणीवपूर्वक हिंदुत्ववादाची कड ओढण्यासारखे आहे. त्यामुळे ‘तरडे’ काय नि इतर कोणता ‘तथाकथित राष्ट्रप्रेमी’ वरील घटनांचा आधार घेत वारंवार संविधानाला नख लावून समाजात विखार पसरवत आहेत. या धर्मांधशक्तींना विरोध करणाऱ्या बुद्धिजीवींना देशद्रोही म्हणणे आजच्या समाजात स्वाभाविक बनत चाललं आहे. जनसामान्यांमध्ये भिनत चाललेल्या या मानसिकतेत बदल घडविणे हे पुरोगामी पक्ष-संघटनांसमोरचं व्यापक आव्हान असणार आहे.

Snehal Shankar

Journalist

Share
Published by
Snehal Shankar
Tags: Narendra Modi pravin tarade RSS Sharad Pawar soniya gandhi नरेंद्र मोदी पार्थ पवार प्रवीण तरडे मोहन भागवत शरद पवार हिंदुत्व