Categories: कृषी

शेतकरी बंधूनो आपल्या ‘रोटावेटर’ची ‘अशी’ करा देखभाल..!

भारतीय शेतकरी दिवसेंदिवस यांत्रिकीकरणावर भर देऊ लागला आहे. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे अवजार आहे. जमिनीच्या नागंरटीपासून ते जमीनीचे सपाटीकरण करण्यापर्यंतची अनेक कामे रोटावेटरच्या सहाय्याने केली जातात. त्यामुळे रोटाव्हेटर शेतकऱ्यांसाठी फायदेशिर अवजार असल्याचे सिध्द झाले आहे. परंतु बऱ्याचदा याचा वापर झाल्यानंतर त्याची म्हणावी तशी काळजी किंवा निगा शेतकरी वर्गाकडून घेतली जात नाही. त्यामुळे अशा उपयुक्त अवजारांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे रोटावेटरची निगा कशी ठेवायची याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

 अशी ठेवा रोटावेटरची निगा – 

  • रोटाव्हेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे व सर्व ग्रीसिंग पॉईंट्सला ग्रीस लावावे.
  • गिअर बॉक्समधील वंगन ऑइलची पातळी तपासावी आणि ते कमी असल्यास त्यात योग्य ग्रेडचे ऑइल घालावे. ऑइल  संपले असल्यास ते बदलावे.
  • रोटावेटरची पाती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाती वाकडी किंवा मोडली असल्यास गरजेनुसार ती बदलावीत किंवा दुरुस्त करावी.
  • चेन पॉकेट व चेन केसमधील ऑईल तपासावे आणि साडेचारशे तास वापर झाला असल्यास ऑइल बदलावे.
  • चेनचा ताण योग्य स्थितीत ठेवावा.
  • रोटावेटर वापरण्यापूर्वी त्याची सर्व नट बोल्ट घट्ट आवळावेत.

रोटावेटरचा वापर करण्यापूर्वी या प्राथमिक तपासण्या करा

  • पोलादी पाते व मुख्य चौकटीचे नट बोल्ट तपासून घट्ट करावेत.
  • गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासून आवश्यक असल्यास तेल टाकावे.
  • ऑइलची पातळी तपासून ती योग्य प्रमाणात ठेवावी ठेवावी. (लेव्हल काठीच्या सहाय्याने तपासावी)
  • नेहमी पुरेशी अतिरिक्त पाती व शिफारस केलेले नट, बोल्ट ट्रॅक्टर सोबत दिलेल्या अवजारांचे पेटीत असल्याची खात्री करावी.
  • रोटावेटर ट्रॅक्टरला जोडताना सर्व लिंक्स व्यवस्थित जोडल्या गेल्या आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.

प्रत्यक्ष शेतात काम सुरू असताना घ्यावयाची काळजी.

  • रोटावेटर शेतात वापरताना अथवा वाहतुकीच्या वेळी तो १० ते १५ सेंटिमीटर पेक्षा सहसा जास्त उचलू नये.
  • पात्यांचा फिरण्याचा वेग पीटीओच्या वेगावर आधारित असल्याने एक्सलेटर वाढवून तो आवश्यक तेवढा ठेवावा.
  • माती कोरडी व काहीशी टणक असेल तर मात्र पहिल्या लो गियरमध्ये ट्रॅक्टर चालवावा.
Team Lokshahi News