बारामती | रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिवापराने शेतीच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट येत आहे. तसेच मिळणारे उत्पादन देखील आरोग्यास हानिकारक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या भरमसाठ किंमती मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात ही मोठी वाढ होते. हीच बाब ध्यानात घेत बारामती कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या साक्षी बोबडे या विद्यार्थिनीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सांगवी ( ता. बारामती ) येथील शेतकरी बांधवांना घरच्या घरी निंबोळी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
साक्षीने, शेतकरी बांधवांना निंबोळी अर्क म्हणजे काय, त्याचे कार्य, निंबोळी अर्काचे महत्व, निंबोळी अर्क बनविण्याची पध्दत, निंबोळी अर्काचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. निंबोळी अर्क बनविण्याची पध्दती अत्यंत साधी व सोपी असून शेतकरी बांधव आपल्या घरी कमीत – कमी वेळेमध्ये निंबोळी अर्काची निर्मिती करू शकतात. प्रथम निंबोळ्यांची साल काढून घ्यावी. निंबोळ्या ऊन्हामध्ये वाळत घालाव्यात. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळीची दळून बारीक पूड करावी. २ किलो निंबोळीची पूड एका कापडामध्ये गुंडाळून ती १५ लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. निंबोळीची पूड पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्याने निंबोळीचा अर्क पाण्यामध्ये उतरून एकरूप होतो. हा अर्क भाजीपाला, पिकांवर फवारल्यास किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते, अशी माहिती तिने शेतकऱ्यांना दिली.
याबरोबरच, रासायनिक किटकनाशकाच्या अति वापरामुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर कसा फायदेशिर आहे, हे देखील सांगवी येथील शेतकरी बांधवांना पटवून दिले. यासाठी साक्षीला, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप गायकवाड, प्राचार्य शरद दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.