Categories: Featured कृषी

मल्चिंग पेपर शेती तंत्रज्ञानाविषयी वाचा सविस्तर..!

शेतकरी विविध प्रकारच्या शेतीसाठी सध्या मल्चिंग पेपरचा वापर करण्याला प्राधान्य देताना दिसतात. हे करत असताना मल्चिंग पेपर चा वापर कसा करावा, मल्चिंग पेपर वापरल्यानंतर शेतीसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, शेतातील मल्चिंगची कशी काळजी घ्यावी? यासारख्या विविध बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच मल्चिंग पेपर वापरणे पिकांसाठी खरोखरच फायदेशिर आहे का? हे पाहणेही गरजेचे आहे.

मल्चिंग फिल्मची निवड कशी करावी
बाजारात मल्चिंग पेपर वेगवेगळ्या रंगांत, आकारात उपलब्ध असतात. पिकांच्या गरजेनुसार रंग, जाडी, आकार इ. गोष्टींचा विचार करून मल्चिंग पेपरची निवड करावी लागते. उदा. भुईमूग पिकासाठी जर मल्चिंग पेपर वापरायचे ठरवले तर सात मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायदेशिर ठरते. एक वर्षाच्या कालावधीची पिके असतील तर २० ते २५ मायक्रॉन, मध्यम कालावधीच्या पिकांसाठी ४० ते  ५० मायक्रॉन, व बहुवार्षिक पिकांसाठी ५० ते १०० मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे ठरते.

मल्चिंग पेपर कसा वापरावा
ज्या पिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे त्याठिकाणी पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे.
बेड तयार करताना माती, दगड, काडी कचरा काढून स्वच्छ माती युक्त तयार करावेत.
बेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्‍यानंतर बेडवर मल्चिंग पेपर व्यवस्थितपणे अंथरावा त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते.  
विविध पिकांच्या लागवडीचे अंतर वेगवेगळे असते त्यानुसार पेपरचे अंतर ठरवले जाते.
आपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे, तेवढाच पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.

मल्चिंग पेपर वापरताना घ्यावयाची काळजी
मल्चिंग पेपर अंथरताना उन्हाचे प्रमाण व वातावरणातील तापमान जास्त असल्यास पेपर अंथरू नये. कमी ऊन असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पेपर अंथरावा. पेपर फिल्मला छिद्रे पाडत असताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. कारण छिद्रे पाडत असताना ठिबक नळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मल्चिंग पेपरला छिद्रे पाडत असताना ते छिद्र एक समान असावे. शक्यतो छिद्र पाडताना ते मल्चिंग ड्रिलच्या साह्याने पाडावे. त्यामुळे छिद्र एकसारखे पडून पेपर ही फाटत नाही. 

पाणी देण्याची पद्धत
बेडवर मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी ठिबक च्या नळ्या टाकाव्यात कारण बऱ्याचदा भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचनची आवश्‍यकता असते.

 • मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे
  • उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यात नियोजन करावे लागते.
  • मल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे क्षारांचे संचयन थांबते.
  • खतांच्या एकूण मात्रेत बचत होते, मल्चिंग पेपरमुळे खते पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
  • जमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते.
  • मल्चिंग पेपरमुळे तण वाढत नाही कारण पेपरमुळे तळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तणांची वाढ होत नाही व त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.
  • मल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.
  • मल्चिंगमुळे मातीला व पिकांना आवश्‍यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: mulching Mulching paper Mulching paper farming mulching paper for horticulture mulching paper save water Mulching paper suitable for crops फळबागांसाठी मल्चिंग पेपर मल्चिंग मल्चिंग पेपर शेती