कोल्हापूर | नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परिक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.५७ टक्के आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये ही परिक्षा पार पडली होती. आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक असून तो ९३.११ आहे. यापाठोपाठ सातारा जिल्ह्याचा ९२.१८ टक्के तर सांगलीचा ९१.६३ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल ९२.४२ टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरवर्षीप्रमाणे मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक अधिक असून ते ९६.५७ टक्के इतके आहे. एकूण ५५ हजार ८१४ पैकी ५३ हजार ९०० इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ६८ हजार ४४४ पैकी ६० हजार ५६९ इतकी मुले उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण ८९.०१ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ५.३३ टक्के इतकी वाढ झाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी फोटो कॉपी हवी आहे, त्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. त्याचे शुल्कही ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुरेश आवारी यांनी दिली आहे.