Categories: बातम्या राजकीय

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधले.

यावेळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. खडसे म्हणाले की, भाजप सोडण्यापूर्वी मी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. तेव्हा दिल्लीतील वरिष्ठांनीच मला भाजप मध्ये तुम्हाला आता संधी नसून तुम्ही राष्ट्रवादीत जा असा सल्ला दिला. त्यानंतरच मी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. 

खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी ४० वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही.’ अशा शब्दात खडसेंनी भाजवर घणाघात केला आहे. 

एकनाथ खडसे यांच्यासह यांनी केला पक्षप्रवेश –
एकनाथ खडसे यांच्यासोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे अशा ७२ नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

Team Lokshahi News