इचलकरंजी | इचलकरंजी नगरपालिकेतील भाजप नगरसेविका नेहा हुक्कीरे यांच्या पतीवर खूनी हल्ला झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून हल्ल्यात विनायक हुक्किरे गंभीर जखमी झाले आहेत. चार ते पाच जणांनी शनिवारी रात्री हा हल्ला केला असून हल्ल्यात कोयता आणि तलवारींचा वापर करण्यात आला.
शनिवारी रात्री इचलकरंजी – कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे हुक्किरे जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळीने त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरानी कोयता आणि तलवारींचा वापर करत दहशत माजवून हा हल्ला केला. यावेळी घाव वर्मी बसल्याने गंभीर जखमी झाले आहेत.जखमी हुक्किरे यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
नेहा हुक्किरे या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यांचे पती व इतर काहीजणांमध्ये गेल्या आठवड्यात वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला रात्री ताब्यात घेतले आहे. तसेच पसार झालेल्या हल्लेखोरांचा परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.