इचलकरंजी : कर्जाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, फायनान्स कंपनीच्या एजंटसह तिघांवर गुन्हा, दोघांना अटक

374

इचलकरंजी | प्रविण पवार | इचलकरंजी शहरात गोरगरीब महिलांना कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या एजंटसह तिघांवर इचलकरंजी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. महिलांकडून कागदपत्रे घेवून त्यांचा गैरवापर करत संगनमातने फसवणूक केल्याचा आरोप या एजंटवर आहे. या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय रामचंद्र कलबुर्गी (वय ४३) आणि अवधुत दिलीप शिंदे (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावं असून याप्रकरणी रुपाली सुनिल गजरे यांनी तक्रार केली आहे. 

सागर सत्यनारायण मोदाणी (वय ३५), संजय कलबुर्गी आणि अवधुत शिंदे या तिघांनी हुपरी इथे राहणार्‍या रुपाली गजरे आणि त्यांचा सोबतच्या महिलांना फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगून संपर्क साधला. त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्याकडील पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचं पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन महात्मा गांधी पुतळाजवळील न्यु फ्रेंड मोबाईल शॉपीमध्ये बोलावलं.

यावेळी संशयित तिघांनी गजरे यांची कागदपत्रे स्कॅन करुन मोबाईलचा रिकामा बॉक्स गीता मानसिंग माने, उषा वंसत जाधव, सुमन विश्‍वास माने यांच्या हातात देवून त्यांचे फोटो काढले. सदरचे फोटो कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांना घरी जाण्यास सांगून चार दिवसांनी तुमचं कर्ज मंजूर होईल, असे सांगितले. नंतर महिलांनी चौकशी केली. मात्र, तुमचे कर्ज मंजूर झाले नाही, असे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर फायनान्स कंपनीचे लोक हप्ता वसुलीसाठी घरी आले. तेव्हा या महिलांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या महिलांची घरची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या संपर्कातील एका महिलेने त्यांना बचत गट स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी तुम्हाला फायनान्स कंपनीकडून प्रत्येकी ९० हजाराचे कर्ज मिळेल असे सांगून ह्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर मोदाणी याच्याकडे १० महिलांची कागदपत्रे दिली.

सद्यस्थितीला यातील ३ जणांच्या तक्रारी समोर आल्या असून आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे. संशयित आरोपींची टोळी असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने इचलकरंजी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनेच्या मुळाशी जावून कसून तपास कारणार असल्याचे सांगितले आहे.