Categories: आरोग्य सामाजिक

इचलकरंजीत वेटरला कोरोनाची लागण, पार्सल नेणाऱ्यांच्यात खळबळ!

इचलकरंजी |प्रवीण पवार| तारदाळ नाक्यावरील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने इचलकरंजीसह शहापूर, तारदाळ नाका परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेले काही दिवस या हॉटेलमधून पार्सलची सुविधा पुरवली जात होती. हा तरूण आणखी एका हॉटेलमध्येही काम करत होता, त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. 

लागण झालेला तरूणाचे वय ३५ वर्षाच्या दरम्यान असून तो सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात वडील वारल्याने तो सोलापूरला गेला होता. तिथून परत आल्यानंतर त्याला अल्फान्सो स्कूलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांनतर तो कामावर हजर झाला होता. याठिकाणी त्याला त्रास जाणवू लागल्याने सुरवातीला खाजगी दवाखान्यात दाखवण्यात आले. तिथून त्याला इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथे संसर्गाची लक्षणे आढळल्याने त्याला काल (१६ जून) कोल्हापूरात सीपीआरमध्ये दाखल केले होते. तेथे त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता ते पॉझिटिव्ह आले आहेत.

शासनाने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, हॉटेल व्यवसाय पूर्ववत करण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ पार्सल सुविधा देण्याच्या अटीवर सध्या हॉटेल व्यवसाय काही प्रमाणात सुरू आहे. परंतु अशा व्यक्तींमुळे पुन्हा समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: ichalkaranji corona positive