कोल्हापूर | इचलकरंजी कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. येथील आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर असूनही जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांकडून इचलकरंजीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
आमदार आवाडे म्हणाले, ” इचलकरंजीत सर्वाधिक कामगार वर्ग असल्याने, कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. त्यामुळे शहरात प्राधान्यांने आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी शासनावर आहे. आयजीएम रुणालयातही परिस्थिती म्हणावी तशी आशादायी नाही. रुग्णालयातील ४३ कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले असते तर हा प्रश्न सहज सुटला असता. मात्र, आपण हा विषय मार्गी लावत असल्यामुळेच तो बाजूला ठेवला गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यामध्ये केवळ राजकारण केले जात आहे. आरोग्य विभागाची मान्यता नसताना कर्मचाऱ्यांना परस्पर शासनाच्या सेवेत घेतल्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवल्याचे सांगण्यात आले. पण हा प्रश्न पुढील काळात आपण मार्गी लावणार आहोत. माझी कामे कोणीही थांबवू शकणार नाही, असे आव्हानही आमदार आवाडे यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे दिले आहे.