Categories: राजकीय सामाजिक

इचकरंजी शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार – आ. प्रकाश आवाडे

इचकरंजी | प्रवीण पवार | शहराला पाण्याची नेमकी आवश्यकता किती, याची नेमकी आकडेवारी अभ्यास करून ठरवा. त्यासाठी पाणी योजना मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे. पालकमंत्र्यांनी इचलकरंजीच्या पाणी योजनेसाठी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांना घेऊन बैठक आयोजित करावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. इचकरंजी शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. नगरपालिकेच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

इचलकरंजीतील नागरिकाना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहरामध्ये १०० पेयजल प्रकल्प उभारणीसाठी केंद्र शासनाकडून ४ कोटी रूपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल नगरपरिषदेच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

इचलकरंजी शहराला गेल्या अनेक वर्षापासून अशुद्ध पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. दुषित पाण्यामुळे काही वर्षांपूर्वी कावीळीच्या साथीने थैमान घातले होते त्यामुळे काही नागरीकांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर उपाय म्हणून शहरामध्ये नागरीकांना मोफत शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहरामध्ये १०० शुध्दपेयजल प्रकल्प उभारण्याचा ठराव पालीका सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात आला होता. परंतू सदर प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता होती त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी केद्रशासनाकडे पाठपुरावा करून शुध्दपेयजल प्रकल्पासाठी ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबददल नगरपालीकेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे,  शिक्षण सभापती राजू बोंद्रे, आरोग्य सभापती गीता भोसले, महिला बालकल्याण सभापती शुभांगी माळी, बांधकाम सभापती किरण खवरे यांचेसह मदनराव कारंडे, सागर चाळके, सुनिल पाटील, प्रकाश मोरबाळे, उदय पाटील यांचेसह नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

Lokshahi News