Categories: ब्लॉग

शेतकऱ्यानं पिकिवलं न्हाय तर ती टिंगाणी काय खाणार हाय?

स्थळ : शहाणेवाडीचा पार
प्रसंग : नेहमीप्रमाणे शहाणेवाडीतील वयोवृद्ध मंडळी पारावर चकाट्या पिटायला जमा झालेली असतात. दिनाप्पा खांद्यावर बांबु (कळक) घेवून पाराच्या दिशेने येत असतात.

संभाण्णा : दिनाबा, कळकानं (बांबु) इदुळा काय कराय निघालासं म्हणायचं?
दिनाप्पा : आमच्या भाजपचं शेतकरी नेते सदाभाऊ खोतांनी सांगिटलय, ‘गुढी उभा करून कृषी विधेयकाचं स्वागत करा’ म्हणूनशनी कळूक घीवून घराकडं निघालतो.
संभाण्णा : हात् त्येजाला, मजी ताटल्या वाजवून करोना भैरा झाला. पुना लायटा घालवून दिवं लावून करोना आंधळा केला. नोटबंदी करुन आतंकवाद्याचं कंबारड मोडलं तसं गुढी हुबा करुन शेतकऱ्यांची प्रगती करणार म्हणा की… हा हा हा
किशादा : लगा, दिनाबा नोटाबंदी, जीएसटी, कलम 370, लॉकडाऊन ह्ये समदं निर्णय कस फसलं ते बघीटलस नवं? आता तरी सुधार मर्दा नाय गावातली माणसं फासून मारतीली.
दिनाप्पा : किशादा, तुमी कायम आमची चेष्टा करतासा नायतर आमच्यावर टिका करतासा, दहा वर्स तुमीबी सरपंच हुतासा वाडीचं, तवा जरा चांगल्याला चांगलं म्हणायला शिका…
किशादा : मर्दा, मी कवाच कुंच्या नेत्याची आन् पक्षाची बाजू घेत न्हाय! जी सत्य हाय त्या बाजूनं बोलतो, त्याच बाजून हुभा ऱ्हातो. दिना या विधेयकामुळं शेतकऱ्याचा फायदा कसा व्हणार ते तरी सांगशील का?
दिनाप्पा : अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक आशी ही तीन नवी विधेयकं हायती. आन् ह्यामुळं, शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा व्यापार देशभरात कुठल्याबी मार्केटला विना कर असणार हाय.
शेतीचे करार कंपन्यासंगट करता येणार हायतं त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादक संघावर अवलंबून ऱ्हायची गरज न्हाय.
जीवनावश्यक वस्तूच्या विधेयकामुळं केंद्र सरकार कडधान्ये, डाळी, कांदा-बटाटा, सूर्यफूल बीया, तेल इ. खाद्यान्याचा पुरवठा असामान्य परिस्थितीत करु शकणार हाय, ज्यामुळं शेतकरी त्याच्या उत्पादनाची मोठी रक्कम मिळवण्यासाठी सक्षम हुणार हाईत.
संभाण्णा : दिनाबा, त्यो वाटसाप वरचा पवाडा वाईच थांबीव आन् मी इच्यारतोय तेवढंच सांग?
दिनाप्पा : आण्णा, ह्यानबारी मी वाटसापवरचं सांगत न्हाई. आमच्या कोल्हापूरच्या चंद्रकांत दादानं, मीम बनवून जाहीर केलंय तेच सांगतूया. तरीबी इच्चारा काय इच्चारायचं ती…
संभाण्णा : इतकी समदं फायद हायत तर त्या पंजाबच्या अकाली दलाच्या मंत्रीनं बाईनं राजीनामा का दिला म्हणायचा? बाकीच बातम्याचं चॅनल दाखवत न्हाईत म्हणून काय झालं? एनडीटीवी वर समद्या शेतकऱ्यांची आंदोलनं दावत्यात की! मर्दा करोनाला बी घाबरना झालंया माणूस आन् एकजागी जमून सरकारचा निषेध करतया ते कशापायी?
दिनाप्पा : ते बगा, कांगरेसचा ह्या विधेयकाला इरोध हाय. त्यनी आफवा पसरवल्यात्या. त्यंचे आयकून शेतकऱ्याचं डोक्स फिरलंय, कंगणा बाय म्हणत्या ती बरुबर हाय, इरोध करणारी दहशतवादी हायत.
किशादा : (मध्येच तोडत) वाह दिनाबा, शेतकऱ्यास्नी दहशतवादी म्हणून आईच्या कुशीचा आन् बाच्या मिशीचा पांग फेडलास! भाड्यानो जरा बोलताना तरी लाजा धरा. शेतकरी पिकीवतूय म्हणून ती व्हयमाली खातीया, शेतकऱ्यानं पिकिवलं न्हाय तर ती टिंगाणी काय खाणार हाय?
संभाण्णा : दिनाबा, विधेयकं जर शेतकरी हिताची व्हती, तर राज्यसभेत धिंगाणा चालू असताना मतदान न घेता वेळ संपलेली असताना वेळ वाढवून उपसभापतींनी त्याच वक्ताला विधेयक पास करायचा अट्टाहास का केला? विधेयकावर चर्चा का झाली नाही? विधेयक स्टँडींग कमिटीकडं का दिल नाही? MSP न देणाऱ्याला तुरुंगवास हे विधेयकात का नमुद केलं नाही?
दिनाप्पा : संभाण्णा तुमी आसं आडवं तंडू नगासा, कांगरेसच्या जाहीरनाम्यात व्हत ही आसं मुदीजींनी बी सांगिटलंय, मग कांगरेसचा दोष न्हाय का?
किशादा : (मध्येच तोडत) दिना मुदीशेठ कवा खरं बोलल्यातं? कांगरेसचा जाहीरनामा त्यांच्या वेबसाईटवर हाय! तस या तिनीबी विधेयकाचा मसुदा कोणत्या वेबसाईटवर जाहीर केलाय सांग? नोटबंदी फसली तर चौकात फास लावा म्हणलं हुत मुदीशेट, घीतली का फाशी?
दिनाआप्पा : आसं कोण फाशी घेत व्हय ती भाषणात म्हणायचं आसतंय.
संभाण्णा : मग, आता काय नवीन चाललंय दिना? भाषण ठोकून मानसांस्नी नेहमीप्रमाणं यड्यात काढायचं चाललंय. पीएम केअर ला देणगी देणारांचा पैरा फेडायला घाई केलीया बघ.
किशादा : दिनाबा घराकडं जा, लॉकडाऊनमुळं नोकरी गेलेल्या तुझ्या पोराला सांग कांगरेसचा जाहीरनामा काढ, आन् मुदी सरकारनं मंजूर केल्याली तिनी विधेयक पण काढ आन् बघ काय कळतंय का आन् मंग तुला कळल्यावर आमांस्नी यीवून सांग. वाटसापनं तर वाट लागली समाजाची मर्दा…
दिनाप्पा : बरं आसं म्हणताय, बर जातो आन् बघतो… (जसे मोदीभक्तांकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत, तशीच उत्तरे दिनाप्पांकडे नसल्याने दिनाप्पा पाय काढतात.)
संभाण्णा : दिनाबा, त्यो कळुक तेवढा दडवून ठेव. नोकरी गेल्यामुळं तुझं पोरगं आधीच ठिशीपीशी करतया, त्यात तु मुदी मुदी करत गुढी हुबाराय गेल्याव त्याच कळाकानं घोपाटी घालंल…
ख्या ख्या ख्या पारावर एकच हशा पिकतो…

– तुषार गायकवाड (लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

Tushar Gaikwad