Categories: Featured कृषी

भेसळयुक्त बियाणे विक्री करताय? मग खा जेलची हवा!

मुंबई। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक काढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टिंगचा वापर केला होता. यामुळे महाबीज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरविताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबीन वाणाचे बियाणे मिसळले गेले असल्याने भेसळ आढळून आली. विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपन्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भेसळयुक्त बियाण्यांचा पुरवठा केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.

मंत्री भुसे म्हणाले,  या प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ३५ टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ७५ लाख रकमेचे नुकसान ज्यांच्यामुळे झाले त्यांच्याकडून ते वसूल करण्यात येणार असून, सोयाबीन बियाणे एमएयूएस ७१ आणि ६२ यांच्या एकत्रीकरणास जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून बियाणे,किटकनाशके यांची भेसळ होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बियाणांच्या भेसळीसंदर्भातील कायदे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत असून, राज्य शासनास त्याप्रमाणे कारवाई करावी लागते. भेसळीसंदर्भातील तक्रारी आल्यास उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती कार्यरत असून, या समितीस आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: agriculture department Agriculture Minister crop loan Dadaji bhuse farm management Farmer loan seed seed production seed seller Selling adulterated seeds