Categories: गुन्हे पर्यटन

हुल्लडबाजांनो.. गगनबावड्यात वर्षापर्यटनासाठी याल तर पोलिसांचा प्रसाद खाल!

गगनबावडा | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना भरती आलीय. गगनबावडा तालुक्यात रविवारी पर्यटनासाठी दाखल झालेल्या अशा पर्यटकांना पोलिसांनी लाठी प्रसाद देत चांगलीच अद्दल घडवलीय. गगनबावडा पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. 

वर्षा पर्यटनासाठी गगनबावडा हे प्रसिध्द ठिकाण असून रविवारी गगनबावड्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील वर्षापर्यटन स्थळे बंद आहेत. त्यामुळे रविवार सुट्टीचा वेळ काढत अनेकांनी गगनबावड्याकडे धूम ठोकली. यामध्ये बहुतांशी तरूण तरूणींचा समावेश असल्याचे दिसून आले. यापैकी अनेकजण दारू ढोसूनच पर्यटन करत असल्याचे पहायला मिळत होते. 

गगनबावड्यात अशा हुल्लडबाज पर्यटकांची होत असलेली गर्दी ध्यानात घेत गगनबावडा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक संगिता पाटील आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई केली. गगनबावडा परिसरातील दोन्ही घाट रस्ते, गगनबावडा चौक आणि पर्यटनासाठी निवडण्यात येणारी ठिकाणे पिंजून काढत हुल्लडबाजी करणाऱ्यांना प्रसाद दिलाय. तर अनेकांचे वाहन परवाने ताब्यात घेत कडक तपासणी केलीय. घाट परिसर आणि कुंभी मध्यम प्रकल्पाकडे पर्यटनासाठी जाणाऱ्यांना अडवून पिटाळून लावलय. 

सध्या गगनबावडा परिसरातील फार्म हाऊस भाडेतत्वावर मिळत असल्याने ती पर्यटक मोठ्या संख्येने अशा फार्महाऊसवर गर्दी करत आहेत. अशा फार्म हाऊस मालकांनाही पोलिसांनी समज दिली असून फार्म हाऊस भाड्याने देण्यास मनाई केली असल्याचे समजत आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: gaganbawada tourism