नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या अथवा घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आता महत्वाचे कामकरावे लागणार आहे. अन्यथा सरकारकडून मिळणारा हा निधी केव्हाही थांबवला जाणार आहे. पीएम किसान योजनेत अपात्र लोकांनी लाभ उकळल्याचे उघड होऊ लागल्याने केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून आता येत्या पाच महिन्याच्या काळात शेतकऱ्यांना आपले खाते आधार लिंक करावे लागणार आहे. विहित मुदतीत खाते आधार लिंक केले नाही तर या योजनेचा लाभ मिळणे आपोआप बंद होणार आहे.
आधार व्हेरिफिकेशन आणि आधार लिंक केले नाही तर सरकार पुन्हा कोणतीही संधी न देता या योजनेचा लाभ देणे बंद करणार आहे, योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. जम्मू काश्मीर, मेघालय, आसाम या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची खाती आधार लिंक आणि आधार व्हेरिफिकेशन झालेली नाहीत. या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. याच कारणास्तव आसाम आणि मेघालय मधील काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा ६ वा हप्ता देखील त्यांच्या खात्यावर जमा केला नसल्याची माहिती आहे. या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम तारीख दिली आहे. तर उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना १ डिसेंबर २०१९ पासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे.
आधार लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी ज्या बॅंकेचा खाते क्रमांक या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी दिला आहे, त्या बॅंकेत जाऊन आपल्या खात्याला आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे. बॅंकेच्या शाखेत आधार कार्डची फोटो कॉपी दाखवून बॅंक कर्मचाऱ्याकडून आपल्या खात्याला आधार नंबर लिंक करता येईल. जवळपास सर्वच बॅंकामध्ये ही सुविधा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. १२ अंकी आधार नंबर लिंक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. परंतु यासाठी आपली नेट बॅंकिंगची सुविधा सुरू असणे गरजेचे आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ आत्तापर्यंत देशातील ११.१७ कोटी शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती असून जवळपास ९५ हजार कोटी रूपयांचा निधी सरकारने या योजनेसाठी वितरित केला आहे. योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात सरकारने ६ हप्त्यांचे वितरण केले आहे. १ एप्रिल २०२० पासून २ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करण्यात आले आहेत. ज्याचा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.