Categories: आरोग्य सामाजिक

तुमच्या रूग्णांना ‘ही’ लक्षणे आढल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला कळवा – खासगी डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक उपाययोजना आखायला सुरवात केली असून अनेक नवे नियम लागू केले आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ३७५ च्या वरती असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२५२ झाला आहे. यापैकी ८५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २५ जणांचा मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्याकडे उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांमध्ये ताप, खोकला व तीव्र स्वरूपाचा ताप, खोकला, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे या स्वरूपाची लक्षणे आढळून आल्यास त्याची माहिती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात सद्या कोव्हिड-19 महामारीची साथ सुरू असून त्यासोबत ताप, खोकला व तीव्र स्वरूपाचा ताप, खोकला, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे या स्वरूपाच्या आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्याकडे उपचाराकरिता येणाऱ्या वरील लक्षणांच्या रूग्णांची संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱ्यांना (महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नगरपालिका/परिषद क्षेत्रात आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच ग्रामीण भागात संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी) यांना कळवावे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: kolhapur corona