Categories: Featured हुणार तरास, पण गुणं हमखास..

एकदा वाचाच.. नेत्यांनो तुमास्नी ‘दूध’ आंदोलन झेपायचं न्हाई : गयाभैनींचा यल्गार

लेखनः स्नेहल शंकर
आमच्या दुधापेक्षा बिसलरीच्या बाटलीलाही जास्त किंमत मिळतीय… आता हे आंदोलनं तुम्हा माणसांना झेपणार नाय… त्यामुळं आमासनीच आमच्या दूधा खातर रस्त्यावरं उतरायची तयारी करायला पायजे. दुधाला भाव नाय ते नाय आता आमचा कामधेनूचा दर्जाच तेवढा राहिलाय त्यो बी काढून घ्या, असा हंबरडा आज महाराष्ट्रातल्या तमाम गयाभैनींनी फोडलाय… दूध दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधलाय… 

हिंदू धर्मात पुराणकाळापासनं आमासनीं मोठ्या परमानावर महत्व हुतं, कारण ह्यो भारत देश कृषी परधान देश हाय. आणि आमी ह्या अर्थव्यवस्थेचा कणा हुतो. साक्षात भगवान शिरी किष्णानं आमची पूजा केलती आनं गौशाळा बी बांधल्या हुत्या. गुरु वाशिष्ठीनी तर आमच्या कुळाचा बी ईस्तार करण्यासाठी आमच्या नव्या जाती हुडकुन काढल्या. आम्ही आमच्या साऱ्या आविष्यात ४ लाख १० हजार ४४० लोकास्नी खाद पुरवीत असल्याचं खुद्द स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हणलं आहे. तुमच्या शासतरज्ञानी सुदीक आमच्या कुळाचं महत्व मान्य केलं आसून, आमी एकमातर असं परानी हावोत जे तुमच काय ते, ऑक्सिजन म्हणत्यात न्हवं ते घेतुय सुदीक आनं सोडतोय सुदीक. आमच्या दुधापसनं ते मूत, श्याण-घाण, धय-ताक, तूपा लोण्याचं लय उपेग असताना बी, काय ह्यो मानसाच्या जातीनं उच्छाद मांडलाय. नाकात दम केलाय गं निसता. आमच्या दुधाचा नगो एवडा सत्यानाश उभ्या हयातीत कवा बगितला न्हायं वो. आमचं दूधं रस्त्यावर वतता आनं ईदेशातल्या गाईची साठवून ठेवल्याली भुकटी खात्यात बेनी. अशा तिखट शब्दात गायींनी माणसाचा समाचार घेतलाय.

पुढे त्या म्हणतात की, आमास्नी माता म्हणत्यात, आनं आमचं दूध रस्त्यावर वत्यात. कुठलं लेकरू असं करतय व्हयं. आमचं दूध वतण्यासाठी माणसांनी आमची कवातरी परमिशन घेतलीय काय? दूध आमच्या रक्ताचं, न्हायी तुमच्या बापाचं असं म्हणत गायींनी यल्गार पुकारला आहे. 

तुमचं माझ्याबद्दलच पिरेम ह्यो एक कावा असल्याचं आता आमच्या गायाभैनिंच्या ध्येनात आलाय. आमच्या पोटात तेतीस कोटी देव हाईत असं म्हंता लेकरानो आनं आमच्यातल्याचं काही जणीस्नी रस्त्यावं उपाशी सोडता. आमची पुरी हायात जाती की रं तुमचं घर भरण्यात आनं आम्हाला दारोवासरी सोडताना तुमाला जराबी मया कशी येत नाय रं लेकांनो. अशी व्यथा मांडत असतानाचं माननीय गायीच्या चिरंजीवांनी ड्रमवर खूर आपटत रॅप सॉंग ऐकविले…

दुधाच्या दरासाठी आंदोलन हे करत्यात. 
शिलकीतली भुकटी ईकून घरं हे भरत्यात..
धन्याच्या दुःखाचं दिस कुठं सरत्यात.
रक्ताचं दूध करून गयामाया मरत्यात..!

आगामी विधानसभेची  निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,  आमास्नी मानणारं पक्ष तुमी काढतायसा आनं दुधाची वाताहत व्हताना तुमच्या डोळ्यात फुलं पडल्यागतं गप बसतायसा. कवा आमासनी बारामतीची उन्हं तर कवा नागपूराची थंड हवा दावतायसा. इतकी वरसं आमची नेतेगिरी करणाऱ्यां खाबूगिरांनी आमच्या दुधाची साय वरपली की, आता हे चालायचं न्हाय! आमच्या गयाभैनींच्या संघटना बांधणीचं काम आमी सुरु केलया. आता कुठल्याचं पक्षाशी सुला व्हणारं न्हाय. अखिल भारतीय खिल्लारं गयाभैंनीच्या सोबतीला गीर आनं जर्शी गया येणार असल्याचा शबुद सुदीक आमास्नी मिळाला हाय. अशा परकारे एकत्रितरित्या दूध दराचा प्रश्न आमी लावून धरणार हावोत. तोडपाणी करणाऱ्या नेत्यांना, गौ नेत्या खुराबाई शिंगे आणि त्यांच्या समर्थक कासंडीभर दुधेबाई यांनी पायांच्या नख्या आवळतं “तुमच्या सायबास्नी आमी भुजणार नसून, आमच्यात फूट पाडायला आमच्या गोठ्याकडं फिरकू नगा” असा धमकीवजा इशारा दिला आहे. कोणीही आमच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये अशी तंबीही त्यांनी यावेळी माध्यमांना भरली आहे. त्याचबरोबर “आता आमचा इरादा पक्का हाय. येणाऱ्या ईदानसभेला आमचा खिलारी धक्का नक्की हाय’ असं म्हणतं आंदोलनाच्या दिशेने खुराबाई आणि दुधेबाई आपल्या समर्थकांसह उधळल्या.  

Snehal Shankar

Journalist