Categories: कृषी हवामान

यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस, मात्र महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन १६ जून नंतरच

पुणे।१ जून। भारतीय हवामान खात्याने शुक्रवार (३१मे) रोजी वर्तवलेल्या हवामानाच्या सुधारित अंदाजानुसार यंदा पाऊस समाधानकारक होणार असला तरी महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन मात्र उशिराच होणार आहे. संपूर्ण देशभरातच यंदा मान्सून उशिरा दाखल होत असला तरी जून ते सप्टेंबर या काळात पाऊस मात्र सरासरीच्या ९६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. 

सध्या महाराष्ट्रात उन्हाचा कहर वाढला असून आणखी काही दिवस वाढत्या उन्हाचा तडाखा महाराष्ट्रवासियांना सहन करावा लागणार आहे. त्यानंतर विदर्भात हलक्या ते मध्यम पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसेंदिवस मान्सूनचे आगमन लांबत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ होऊ लागली आहे.

सध्या अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले असले तरी त्याची पुढील वाटचाल मात्र संथ गतीने सुरू आहे. दरवर्षी  साधारण १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा ७ जूनच्या (+/- दोन दिवस) आसपास केरळात येईल, असा सुधारित अंदाज आहे. तर महाराष्ट्राला मान्सूनच्या आगमनासाठी १५ जून पर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याचे अनुमान आहे. 

भारतीय हवामान खाते (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, यावर्षी मध्य भारतात सर्वाधिक म्हणजेच १०० टक्के पावसाची शक्यता आहे, महाराष्ट्राचा समावेशही मध्य भारतात होतो. मात्र या अंदाजानुसार महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी सरासरीइतकाच पाऊस पडेल असे नाही. ही सरासरी मध्य भारतासाठी दिलेली आहे. तर उत्तर आणि पश्चिम भारतात ९४ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतातील पावसाची यंदाची सरासरी ९७ टक्के राहील, तर ईशान्य भारतात ९१ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचा अंदाज वर्तवताना मॉडेलनुसार त्यामध्ये अधिक/उणे चार टक्क्यांचा फरक अपेक्षित असतो. 

हवामान विभागाच्या या ताज्या अंदाजानुसार, देशातील काही भागात अवर्षणग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता १५ टक्के आहे, तर अतिवृष्टीची शक्यता केवळ दोन टक्के आहे. हवामान विभागाच्या या सुधारित अंदाजामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला आता मान्सून आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. 

By Lokshahi.News

Lokshahi News