Categories: कृषी बातम्या सामाजिक

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. खासदार संजय मंडलिक यांनी यासंदर्भात वनमंत्री राठोड यांची मुंबई येथे भेट घेवून हत्तींचा उपद्रव रोखण्याची मागणी केली होती. यावेळी मंडलिक यांचेसोबत आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील तसेच वनखात्याचे मुख्य सचिव दिपक म्हैसकर व मुख्य वन अधिकारी आपटे उपस्थित होते.

जिल्ह्यातील वन क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत आहे. जंगली हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत असून जीवीत व पिक हानी यामुळे वनक्षेत्रालगतच्या गावातील ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्या दोन हत्ती चंदगड, आजरा वनक्षेत्र परीसरात वावरत आहेत. त्यामुळे या जंगली हत्तींसाठी तत्काळ निर्णय घेवून प्रतिबंधात्मक योजना करावी अशी आग्रही मागणी खा. मंडलिक यांनी केली.  

यावेळी झालेल्या चर्चेनुसार चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात नागरी वसाहतीमध्ये हत्ती फिरत असले कारणाने या तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठवणे व कर्नाटकातून चंदगड मध्ये येणाऱ्या हत्तींचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक कर्नाटक व महाराष्ट्र यांचे समन्वयाने कर्नाटकातील पाळीव हत्ती आणून आजऱ्यातील हत्तीला कर्नाटकात पाठवणे, कर्नाटकातून येणाऱ्या हत्ती व टस्करांचा प्रतिबंध करणेसाठी खिंडीतील मार्ग वाघोत्रे – गुडवळे चंदगड येथे वायर फ्लेमिंग करणे, तामिळनाडू राज्याने हत्तींच्यासंदर्भात राबवलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करुन अशाच पध्दतीच्या योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबवणे, वन्य प्राण्यांमुळे शेतीमालाची नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: tusker attack tusker control