अहमदनगर | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ करण्यात ठिबक सिंचनचे महत्व यापूर्वीच सिध्द झाले आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी व त्यांच्या शेतीचा विकास साधण्यासाठी ‘ठिबक शिवधनराई’ ही योजना राबविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. याची माहिती अॅड.कारभारी गवळी यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. शेतीतून शाश्वत उत्पन्नाची हमी नसल्याने गेल्या २० वर्षात महाराष्ट्रातील अनेक शेतकर्यांनी पीके घेणे सोडून दिले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जमीनी पडीक होत चालल्या आहेत. तर अनेकांनी निसर्गाच्या लहरीपणा व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ठिबक शिवधनराई योजनेचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.