Categories: बातम्या सामाजिक

आजपासून अनलॉक-5 ची अंमलबजावणी; ‘हे’ आहेत नवे निर्णय

राज्यात ३१ ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई | केंद्र शासनाने अनलॉक ५ संदर्भात नवी नियमावली जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या सूचनावलीनुसार राज्यात ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेनेच ही सेवा सुरू ठेवली जाणार आहे. तर शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस तूर्तास बंद राहणार आहेत.

दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे नियम कायम राहणार आहेत. यामध्ये फेस मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी टाळणे, सामाजिक अंतर पाळणे याबाबींचा समावेश बंधनकारक राहणार आहे. अनलॉक ४ ची मुदत संपत आल्याने अमलॉक ५ बाबतचे नवीन सूचना कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

राज्य सरकारने पुणे विभागातील ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात धावणारी लांब पल्ल्याची रेल्वेसेवा सुरू केली जाणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कामगारवर्गच लोकलने प्रवास करू शकतो. तरीही लोकलला गर्दी होत असल्याने लोकलची संख्या वाढवली जाणार आहे. यासोबतच लोकलमधून डबेवाल्यांनाही क्यूर कोड घेऊन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये मुंबई आणि आसपासच्या शहरात केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनाची परवानगी होती. ती शिथिल करण्यात आली आहे. यासोबतच सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स बाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. 

१ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारकारने जारी केलेल्या सूचना 

  • थियटर मल्टीप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू करणार, यासाठी माहिती प्रसारण मंत्रालय स्वतंत्र एसओपी जाहीर करणार
  • बिझनेस टू बिझनेस एग्जिबिशन्स लावण्यात येणार
  • खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरात येणारे जलतरण तलाव सुरू करणार
  • अम्युजमेंट पार्क आणि अशा पध्दतीच्या ठिकाणी खेळण्यास परवानगी
  • शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस टप्प्याटप्याने सुरू, राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेशाना परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार
  • ऑनलाईन शिक्षण पध्दती सुरू राहणार
  • उच्च शिक्षणसाठीच्या संस्था सूरू करण्याचा निर्णय गृहमंत्रालय घेणार
  • १५ ऑक्टोबरपासून पीएचडी आणि पदव्युतर अभ्यासक्रमासाठी सुरू असणाऱ्या प्रयोगशाळा आणि प्रायोगित तत्वावर वर्ग सुरू करण्यास परवानगी
  • सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाना परवानगी (१०० व्यक्तींची मर्यादा)
Team Lokshahi News