Categories: कृषी

‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महत्वाचे आवाहन

मुंबई | बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयंरोजगार देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केली. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित ‘बांबू मिशन’अंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले, यावेळी पणजी, गोवा येथील राजभवन येथून उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

बांबू लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो. शेतजमीन, जंगल तसेच पहाडी प्रदेश कोठेही बांबू लागवड होते. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या बांबूपासून टोपली, फर्निचर, वस्त्र, दाग-दागिने, राखी यांसह अनेक वस्तू तयार होतात. जीवनाच्या आरंभापासून तर थेट अंत्ययात्रेपर्यंत बांबू माणसाला उपयुक्त असणारी वस्तू असल्याचे सांगून विद्यापीठांनी आणि विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण जनतेला बांबू लागवड तसेच बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे विपणन करण्यासाठी मदत करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांनी केवळ अध्यापनाचे कार्य न करता समाजाला आपले योगदान दिले पाहिजे असे सांगून विद्यापीठांनी बांबू मिशनला आपले मिशन बनवून यशस्वी करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र सरकारने बांबू मिशन सुरु करून सन २०१७ साली बांबूला वृक्ष न मानता गवत मानावे या दृष्टीने विधेयक पारित केले आहे. सदर विधेयकामुळे वनवासी व आदिवासी लोकांना बांबूचा उपजीविकेसाठी उपयोग करता येऊ लागला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

गोवा राजभवन येथे बांबू फर्निचर
गोवा येथील काबो निवास राजभवन ४५० वर्षे जुने असून या ठिकाणी बांबूचा विविध ठिकाणी उपयोग केलेला आहे. मुंबई येथील राजभवन येथे नवी वास्तू तयार होत असून त्या ठिकाणी फर्निचर घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र राजभवन येथे केवळ बांबूपासून तयार केलेलेच फर्निचर घ्यावे, अशी सूचना आपण केली असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

चर्चासत्राला कुलगुरु डॉ पी. पी. पाटील, प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर, धडगाव, जि. नंदुरबार येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंत वळवी, प्रो बी व्ही पवार, रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंके यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, निमंत्रित वक्ते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bamboo Nursery Bamboo Planting Grant Bamboo Planting pdf Bamboo Varieties Commercial Bamboo Planting Information about Bamboo Marathi Maharashtra Bamboo Development Corporation Manga Bamboo Planting बांबू जाती बांबू रोपवाटिका बांबू लागवड pdf बांबू लागवड अनुदान बांबू विषयी माहिती मराठी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ माणगा बांबू लागवड व्यावसायिक बांबू लागवड