Categories: Featured आरोग्य

रेड झोन, कंन्टेनमेंट झोन, इतर राज्य किंवा परदेशातून येणाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा निर्णय…!

कोल्हापूर। कोव्हिड रुग्णालय, केअर सेंटर आणि हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींच्या अलगीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले. जिल्ह्याबाहेरुन रेड झोन, कंन्टेनमेंट झोन किंवा इतर राज्ये किंवा परदेशातून आलेले आहेत अशा व्यक्तींची तपासणी करुन स्वॅब घेणे बंधनकारक आहे. स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शासकीय संस्थात्मक अलगीकरणात होणार रवानगी.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत पुढील प्रमाणे धोरण निश्चित करण्यात आले. संस्थात्मक अलगीकरण-ज्या व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन रेड झोन, कंन्टेनमेंट झोन किंवा इतर राज्ये व परदेशातून आलेल्या आहेत अशा व्यक्तींची तपासणी करुन स्वॅब घेणे बंधनकारक आहे. स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शासकीय संस्थात्मक अलगीकरणात पाठवावे. वरील व्यक्तींनी खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये स्वखर्चाने राहण्यासाठी विनंती केल्यास अशा ठिकाणी स्वखर्चाने संस्थात्मक अलगीकरण करावे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोठूनही विना परवानगीने आलेल्या व त्यांची परत पाठवणी शक्य नसल्यास अशा सर्व व्यक्तींची सक्तीने स्वॅब तपासणी करण्यात यावी व शासकीय संस्थात्मक अलगीकरण करण्यात यावे. गृह अलगीकरण- कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन ग्रीन व ऑरेंज झोन जिल्ह्यामधून (परंतु कंन्टेनमेंट क्षेत्र वगळून) आलेल्या व्यक्तींना कोणतीही कोव्हिड सदृश्य लक्षणे नसल्यास गृह अलगीकरणात पाठवावे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय ग्राम, प्रभाग समितीचा राहील. ग्राम समितीने, प्रभाग समितीने अशा व्यक्तींना राहण्यासाठी स्वतंत्र घर, खोली, वस्तीवर घर आहे याची खात्री करावी व फक्त अशा व्यक्तींनाच गृह अलगीकरणात ठेवावे. अन्यथा ग्राम समितीने अशा स्वतंत्र सुविधा नसलेल्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात पाठविण्याचा निर्णय घ्यावा.

कोल्हापूर जिल्ह्यात येण्यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणात राहून 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींना (सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यास) कोणतीही कोव्हिड-19 सदृश्य लक्षणे नसल्यास प्राथमिक तपासणीनंतर गृह अलगीकरणात पाठवावे. परंतु अशा व्यक्तीचा प्रवास इतिहास जर रेड झोन क्षेत्र, बाधित क्षेत्रामधून असल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरणात पाठवावे. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन आलेल्या व कोव्हिड सदृश्य कोणतीही लक्षणे नसलेल्या विशेष गरजा असलेल्या व्यक्ती म्हणजेच मनोरुग्ण, गरोदरपणाच्या शेवट्या तिमाहीतील स्त्रिया, विकलांग व्यक्ती यांच्याबाबतीत त्यांना राहण्यासाठी घरी स्वतंत्र खोली व इतर व्यवस्था आहे याची खात्री हमी पत्र घेवून गृह अलगीकरण करण्यात यावे. परंतु अशा व्यक्ती रेड झोन, बाधित क्षेत्र किंवा कंन्टेनमेंट झोनमधून आल्या असल्यास त्यांचे त्वरित स्वॅब घेवून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना गृह अलगीकरण करावे. घरी राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही अशी ग्राम समिती, प्रभाग समितीची खात्री झाल्यास नजिकच्या संस्थात्मक अलगीकरणात पाठवावे.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी याबाबतचे पत्र आवश्यक त्या कार्यवाहीसाठी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोव्हिड रुग्णालय, कोव्हिड केअर व हेल्थ सेंटर यांचे सर्व प्रभारी अधिकारी, ग्रामीण रुग्णालये व उप जिल्हा रुग्णालयाचे सर्व अधीक्षक, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व गट विकास अधिकारी यांना पाठविले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Kolhapur Important news kolhapur news update