कोल्हापूर | कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे, मंदिरे, धर्मादाय संस्था, मंडळांच्या वतीने दि.२९ व ३० डिसेंबर रोजी साजरी होणारी दत्तजयंती उत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यावेळी फक्त प्रतिकात्मक स्वरुपात श्री दत्तजयंती साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
गगनबावडा येथे गगनगडावर मोठ्या उत्साहात दरवर्षी दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. या काळात येथे हजारो भाविक उपस्थित राहतात. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका असल्याने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दत्त जयंती निमित्त भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत श्री. गगनगिरी महाराज ट्रस्ट यांना पत्र पाठवलेले आहे. दरम्यान या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तउत्सव रद्द करण्यात आल्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाने काढले होते. त्याचबरोबर ठिकठिकाणच्या रेणुका यात्राही रद्द करण्यात आल्या होत्या. आता संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरे होणारे दत्तजयंती उत्सवही रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.