Categories: कृषी बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; मुख्यमंत्री ठाकरे यांचे कृषिविभागाला निर्देश

मुंबई | शेतकरी बांधव सर्वस्व पणाला लावून कांदा पिकवतो अशा वेळेला जर त्याला भाव मिळाला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट कोसळते. कधीकधी शेतकऱ्याने पिकविलेल्या सोन्यासारख्या शेतमालाला माती मोल भाव मिळतो. हे थांबविण्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिले. तसेच कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे, त्यासाठी देखील अशी यंत्रणा उभी करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. यावेळी शिरूर, जुन्नर, वैजापूर, सिन्नर आणि अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथील साठवणुक प्रकल्पांचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही केले.

शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे. विभागवार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गटशेतीला प्राधान्य दिले पाहिजे. शेतात राबणारा शेतकरी जगाचा अन्नदाता आहे. त्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा नाही अशा परिस्थितीत या अन्नदात्याला हमीभावापेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढतानाच त्याला स्वावलंबी बनवून त्याच्या सुखासाठी काम करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याबरोबरच बाजारात ज्याला मागणी आहे ते पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘विकेल ते पिकेल’मुळे शेतकऱ्यांच्या हातात यशाची गुरूकिल्ली- उद्योगमंत्री
उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात यशाची गुरूकिल्ली मिळाली आहे. उद्योग आणि कृषि विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी गाळे, साठवणूक केंद्र उभारणी करून दिले जातील. याठिकाणी प्रक्रिया केंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी उभारली २१ लाख मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता- कृषिमंत्री
कृषिमंत्री भुसे म्हणाले, देशाच्या एकूण कांदा उत्पादनाच्या ५० टक्के कांदा देशपातळीवर पुरविण्याचे काम महाराष्ट्रातील शेतकरी करीत आहेत. राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वैयक्तीक पातळीवर सुमारे २१ लाख मेट्रिक टनाची कांदा साठवणुक क्षमता उभी केली आहे. याकामी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचे सांगतानाच नाफेड मार्फत कांदा खरेदी करताना बाजारपेठेत जो दर असेल त्याप्रमाणे खरेदी करण्याची आवश्यकता असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: CM Uddhav thakareay