Categories: Featured कृषी

थकीत कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण..!

पुणे| महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांबाबतीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी महत्वाची गोष्ट बाब स्पष्ट केलीय. राज्यसरकारने याबाबत यापूर्वीच निर्णय घोषित केला असला तरी अद्याप उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था कायम आहे. त्याच अनुषंगाने कृषिमंत्र्यांनी, शेतकरी कर्जाचे पैसे व्याजासकट सरकार भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही सर्व संबंधित बॅंकाना दिल्याचे त्यांनी सांगितले. ते पुणे येथे आयोजित खरीप आढावा बैठकीत व्हीडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बोलत होते.

यावेळी भुसे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात २ लाखांच्या आतील कर्ज असलेले शेतकरी पात्र आहेत. यापैकी १९ लाख शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी रुपये खात्यावर वर्ग झाले आहेत. तर लॉकडाऊनमुळे ११ लाख शेतकऱ्यांचे साडेनऊ हजार कोटी रुपये थांबले आहेत. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर या कर्जमुक्तीची पुढील प्रक्रिया सुरु होईल. तोपर्यंत या शेतकऱ्यांचे पीककर्ज शासनाकडून येणे दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  या शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे सरकार भरणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. अशी माहिती कृषिमंत्री  भुसे यांनी दिली आहे. 

खरीप हंगाम २०२० नियोजनाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सह संचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अग्रणी बँकेचे अग्रणी व्यवस्थापक आनंद बेडेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात मुबलक बियाणं आणि खतं उपलब्ध आहेत. युरिया ५० हजार मेट्रिक टन बफर स्टॉक केला जाणार आहे. त्यामुळं बियाणं आणि खताची टंचाई येणार नाही. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार आहे. काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत, तर काही ठिकाणी १०-१५ टक्के पीक कर्ज वाटप झालंय. असंही भुसे म्हणालेत. 

Team Lokshahi News