Categories: गुन्हे पर्यावरण प्रशासकीय सामाजिक

पंचगंगा प्रदुषण : निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे जीवनदायीन्यांचाच जीव धोक्यात..!

– पवन डोंगरे

भारतीय संस्कृतीत नद्यांना जीवनदायिनी असे संबोधत अनन्यसाधारण महत्व दिले आहे. त्याचबरोबर देशाची संस्कृती आणि सभ्यतेचा दर्पण म्हणूनही नद्यांकडे पाहिले जाते. या नद्यांच्या काठीच प्रगत अशा संस्कृत्यांचा उगम झाला. मात्र वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. त्या जैविकदृष्ट्या मृत झाल्या असून त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. भारतीय संस्कृतीच्या आडून समाज, राज्यकर्ते, भ्रष्ट अधिकारी या जीवनदायिनींच अस्तित्वच नष्ट करण्यावर टपले आहेत.

अशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदी प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती. मात्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ती पुन्हा वाढू लागली आहे. होणाऱ्या प्रदूषणा संदर्भात प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करून ही यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नाही. जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाची बाब जीवघेणी बनत चालली आहे. या प्रदूषणाचा नदीच्या काठावरील गावांना फटका बसत आहे. वेळीच लक्ष न दिल्यास गावातील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कारखानदारी बरोबरच सध्या खाजगी उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. परंतु हे कारखाने बऱ्याचदा नदी प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवून निगरगट्टपणे आपली कारखानदारी करताना दिसतात. कारखान्यातून निघणारे दूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडण्यात येते. त्याचबरोबरीने कारखाना परिसरातील शेतात रात्रीच्या दरम्यान रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. यामुळे शेतजमीनी नापीक होत असून भूगर्भात काळे पाणी उतरते. नदीतील असो वा भूगर्भातील दूषित पाण्यामुळे व हवेमुळे कारखाना परिसरातील लोकांना साथीचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचा रोग यासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी होतात. यावर जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून केवळ नमुने तपासणीचे नाटक रंगवण्यात येत असल्याची शंका निर्माण होते.

कोरोनाच्या काळात तर या अधिकाऱ्यांचं चांगलंच फावलं आहे. लॉकडाऊन, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि आता पूर अशी एक ना अनेक कारणे दाखवून जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. तसा आरोप कारखाना परिसरातील लोकांकडून जिल्हा प्रदूषण नियंत्रण महामंडळावर होत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हावासियांकडून करण्यात येत आहे.

Lokshahi News