Categories: तंत्रज्ञान

अर्रर्रर.. पब्जीचा डाव ढिस्स्स!

नवी दिल्ली | मोदी सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटली स्ट्राईक करत ‘प्लेअर अननोन बॅटल ग्राउंड’ म्हणजेच पब्जीवर बंदी आणली आहे. तरुणाईसह लहान मुलांत प्रचंड लोकप्रिय असलेले गेमिंग पब्जी, कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह चीनशी संबंधित एकूण ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर केंद्राने बंदीची घोषणा केली. जूनमध्ये भारताने टिकटॉकसह ४७ अ‍ॅपवर बंदी आणली होती. जुलैमध्ये ५९ चिनी अ‍ॅप्स प्रतिबंधित केले. अशा एकूण २२४ अ‍ॅप्सवर आतापर्यंत बंदी आणण्यात आली आहे.

पूर्व लडाखमध्ये एलएसीवर चीनविरुद्ध तणाव सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘हे अ‍ॅप्स देशाचे सार्वभौमत्व व अखंडत्व, देश-राज्याची सुरक्षितता व सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. मंत्रालयाकडे यासंबंधात अनेक तक्रारी आल्या होत्या. अनेक अहवालांनुसार, अँड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध अनेक अ‍ॅप्स युजर्सचा डेटा चाेरी करून भारताबाहेर पाठवत होते. त्यामुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे ही मंत्रालयाने निवेदनात म्हंटले आहे. 

जगभरात तब्बल १७.५ कोटी लोकांनी पब्जी डाऊनलोड केेले आहे. यात सर्वाधिक ५ कोटी युजर्स भारतात आहेत. पैकी ३.५ कोटी सक्रिय आहेत. पब्जीने यंदाच्या सहा महिन्यांत सुमारे ९,७०० कोटींची कमाई केली. कंपनीचे आजवरचे उत्पन्न २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. द. कोरियन व्हिडिओ गेम कंपनी ब्ल्यूहोलने हा गेम डेव्हलप केला आहे. त्यात चिनी कंपनी टॅन्सेंटचीही हिस्सेदारी आहे.

Team Lokshahi News