Categories: कृषी

देशाचे साखर उत्पादन घटले, हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे!

जानेवारीचा पहिला पंधरवडा संपण्याआधीच नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचे धुराडे उसाअभावी बंद.

पुणे।३ जानेवारी।यंदाच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आलयं. मागील वर्षीच्या गळीत हंगामाशी तुलना करता यंदा ३३.७७ लाख टन साखर उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झालयं. यंदाच्या वर्षी डिसेंबर अखेर ७७.९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 

यंदा नेहमीप्रमाणे देशाच्या साखर उत्पादनात उत्तरप्रदेशचा वाटा सर्वाधिक असून ३३.१६ लाख टन उत्पादन आहे. दुसऱ्या क्रमांकावर १६.५ लाख टन साखर उत्पादन करत महाराष्ट्रही आघाडीवर आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ही माहिती दिली आहे.

देशात यंदा ४३७ साखर कारखाने गाळप हंगाम घेत असून गेल्यावर्षी देशात ५०७ साखर कारखान्यांनी गाळप केले होते. या कारखान्यांनी २०१८ च्या डिसेंबर अखेरपर्यंत १११.७२ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदा महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात पावसाने मोठे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. तर महाराष्ट्रातील पावसाळा लांबल्याने तसेच मॉन्सून हंगामाच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे साखर कारखाने एक महिना उशीराने चालू झालेत.

डिसेंबर अखेरीस महाराष्ट्रात १३७ साखर कारखाने सुरु असून गेल्यावर्षी याच काळात १८७ कारखान्यांनी ४४.५७ लाख टन साखरचे उत्पादन केले होते. तर राज्याचा सरासरी साखर उतारा साडेदहा टक्के होता. यंदा साखर उतारा १० टक्क्यापर्यंत खाली घसरला आहे. 

Team Lokshahi News