Categories: आरोग्य

कोरोनासंदर्भात भारत सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली। जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारने अनेक देशातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. १३ मार्चच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, आंतरराष्ट्रीय संघटना याव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. 

  • देशात आतापर्यंत ६० जणांना कोरोनाची लागण.
  • दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत भर.
  • महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ११ वर पोहचला आहे.

भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी विना व्हिसा मिळणाऱ्या एन्ट्रीलाही या काळात स्थगित राहणार आहे. याशिवाय भारतीय नागरिकांनी अनावश्यक परदेशी यात्रा करु नये, अशा सूचना देखील सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जे भारतीय परदेशातून मायदेशी परतणार आहेत त्यांना १४ दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस निरिक्षणाखाली रहावे लागेल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोना विषाणूने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे म्हटले आहे. कोरोना हे जागतिक संकट असल्याचेही घोषीत करण्यात आले असून याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखे आहे, असा उल्लेख WHO संघटनेने केला आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona news Corona virus corona- indian government coronavirus Indian Medical Association WHO