Categories: कृषी राजकीय

भारत – चीन सीमावादाचा भारतीय शेतीला असाही फटका..!

भारत -चीन सीमावादाचा फटका देशातील सर्वच उद्योग व्यवसायाला बसला आहे. यामुळे देशातील शेतीव्यवसाय ही काही प्रमाणात अडचणीत सापडला असून भारताने चीनमधून होणाऱ्या पॉवर टिलरच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. भारतामध्ये शेती कामांसाठी आता यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. शेतीची बरीचशी कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. यामध्ये पॉवर टिलरचा मोठा वाटा आहे. परंतु चीनमधून आयात होणाऱ्या पॉवर टिलरलाच भारतीय बाजारपेठांचा दरवाजा बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याचा धोका आहे. दरम्यान सरकारने देशी पॉवर टिलरला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात असले तरी देशी पॉवर टिलर कधी आणि केव्हा उपलब्ध होणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

पॉवर टिलर हे एक शेतीसाठी लागणारे यांत्रिक साधन असून शेताच्या नांगरणीपासून ते पिकाची काढणी आणि मळणीपर्यंतच्या कामांसाठी उपयुक्त आहे. नांगरात जशी पेरणी सरळ रेषेत केली जाते त्याचप्रमाणे या मशीनद्वारे पेरणी केली जाते. विशेष म्हणजे पॉवर टिलरमध्ये गरजेनुसार वेगवेगळे कृषी यंत्र जोडल्यास त्याचा बहुउपयोग सहजरित्या करता येतो. तसेच ते ट्रॅक्टरपेक्षा खूप हलके असल्याने सहज चालवता येते. 

पॉवर टिलरने होणारी कामे

  • हे यंत्र नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी यासाठी उपयुक्त आहे.
  • पॉवर टिलरमध्ये वॉटर पंप टाकून शेतकरी तलावातील, आणि नदीतील पाण्याचा उपसाही करू शकतो.
  • थ्रेशर्स, कापणी करणारे, लागवड करणारे, बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र, इत्यादी देखील यात जोडल्या जाऊ शकतात.
  • पॉवर टिलर वजनाने हलके असल्याने याची वाहतूक कुठेही करता येते.

भारतात शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यामध्ये पॉवर टिलरची मागणी अधिक आहे. पॉवर टिलर प्रकारात केवळ मोजक्याच कंपन्या असून त्याची मोठ्या प्रमाणात आयात होते. आता सरकारने चिनमधील आयातीवर निर्बंध लादल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जागतिकीकरण्याच्या प्रक्रियेत सर्वच देशांचे एकमेकांवरील अवलंबत्व वाढले आहे. त्यामुळे पैशापासून अवजारांपर्यंत सर्वच गोष्टींची मुक्त वाहतूक सुरू आहे. आता भारत आणि चीनच्या सीमावादाने तोंड वर काढल्याने या प्रक्रियेला खीळ बसली आहे. याचा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: central government policy china power trillers india china border crisis indiachina power tiller imports restrictions on power tiller imports चीनी पॉवर टिलर पॉवर टिलर आयात पॉवर टिलर आयातीवर निर्बंध भारत-चीन