Categories: नोकरी

नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ रिक्त पदे तातडीने भरण्याची सूचना

मुंबई | नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्या वतीने वेबिनार आयोजित करण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले. त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. 

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने नर्सेससाठी प्रथमच वेबिनार आयोजित करण्यात आल्याची आणि नर्सेसना आपल्या समस्या, अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कोरोना काळात नर्सेसनी केलेल्या अत्यंत चांगल्या कामाची मांडणी करतानाच त्यांना आलेले अनुभव, अडचणी यावर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर आधारित जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. नर्सेस कॅडरमधील समन्वय करणारी जी वरिष्ठ पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. हिवाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात  बैठक घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास,संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.अभय शुक्ला, डॉ श्वेता मराठे, नर्सिंग संघटनेच्या प्रा.प्रविणा महाडकर, डॉ. स्मिता राणे उपस्थित होते.

Team Lokshahi News