कोल्हापूर। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०१९-२० फलोत्पादन यांत्रिकीकरण या घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८ एचपीपेक्षा लहान पॉवर टिलर (भौतिक१) या बाबीसाठी तसेच सामुहिक शेततळे (भौतिक १) या बाबीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०१९-२० अंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत पॉवर टिलर व सामुहिक शेततळे या घटकासाठी हॉर्टनेट प्रणालीवर घटकनिहाय व उपघटकनिहाय अर्जाची प्रतिक्षा यादी संपली आहे. सद्य स्थितीत या घटकांचा लक्षांक जिल्हास्तरावर शिल्लक आहे. यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी बातमी प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अर्ज करावेत. लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून योजनेची अंमलबजावणी मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल.
सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन वाढविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नविन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरूजीवन करणे, सामुहिक शेततळयांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेड्नेटहाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अन्नद्रव्ये व एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीत्तोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.