Categories: Featured

आर्थिक मंदी दूर करण्यासाठी तातडीने पावले टाका- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची भारतास सूचना

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) । २४ डिसेंबर। भारतातील आर्थिक मंदी आता जगजाहीर झाल्याने सर्वच पातळीवरून भारताला सल्ले दिले जात आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील भारतातील आर्थिक मंदीवर भाष्य केले असून भारताने आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी भारत सरकारने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत, असे म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था हे जागतिक विकासाचे एक प्रमुख इंजिन आहे. त्यामुळे भारताने आपल्या अर्थव्यवस्थेतील मंदीवर तातडीने उपाय योजावेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे.

जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत ही एक अर्थव्यवस्था आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून देशात मंदीची स्थिती आहे. ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुंतवणुकीतही घट झाली आहे. उद्योग धंदे बंद पडू लागलेत. रोजगाराच्या नवीन संधी घटल्या आहेत. या कारणांमुळे सरकारच्या कर महसुलाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे. यासर्व बाबींकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने लक्ष वेधले आहे. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे रानिल सालगाडो यांनी भारतातील आर्थिक मंदीवर भाष्य करताना म्हणटले आहे की, अनेक लोकांना गरिबीतून बाहेर काढल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था स्वतःच अडचणीत सापडली आहे. या पेचातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. विकासाला चालना देण्यासाठी सरकारी निधी वितरित करण्यावरही सरकारकडे मर्यादित संधी उपलब्ध आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय आखून यावर भारत सरकारने यावर मात करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलय. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी देखील मागील आठवड्यात भारताच्या विकासदराचा अंदाज पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’मध्ये आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली होती. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था सध्याच्या घडीला खराब अवस्थेतून वाटचाल करत असल्याने यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला क्रमप्राप्त झाले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: india economic slowdow International Monetar fund आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आर्थिक मंदी