दिल्ली।बॅंकाचं ‘इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिट नेटवर्क’ – Interoperable Cash Deposit (ICD) सर्वच बॅंकानी वापरल्यास सर्वसामान्य लोकांची बॅंकेत कॅश भरायला जाण्याची कटकट कायमची मिटणार आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही एटीएम सेंटरच्या माध्यमातून आपल्या खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. सध्या देशभरातील १४ बँका ‘इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट नेटवर्क’ वापरतात. या सगळ्या प्रमुख बँकांचे सुमारे ३० हजार ATM तात्काळ अपडेट केले जाऊ शकतात.
हे नेटवर्क सर्वच बॅंकानी वापरण्यास सुरवात केल्यास सामान्य लोकांना बँकेत कॅश डिपॉझिट करण्यासाठी जावं लागणार नाही. यामुळे तुम्हाला जर Kotak Mahindra, HDFC किंवा Bank of India यासारख्या कोणत्याही बँकेत पैसे जमा करायचे असतील तर SBI च्या ATM सेंटरच्या मदतीनेही तुम्ही ते जमा करू शकणार आहात. सध्या बॅंकेच्या शाखेत जाऊन हे काम करावे लागते, तेच काम ATM च्या माध्यमातून तुम्ही कुठूनही करू शकता. सध्या यूनियन बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक आणि साउथ इंडियन बँक या सारख्या काही ठराविक बॅंकाच ही सुविधा देत आहेत. सध्या १० हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटसाठी २५ रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागते. तर यापेक्षा अधिक रक्कम असल्यास ५० रुपये प्रोसेसिंग फी देणे गरजेचे आहे.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात (UPI) नुसार बँकिंग पेमेंटची सेवा सुरू केल्यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) बँकांसाठी ATM च्या माध्यमातून कॅश डिपॉझिट (Cash Deposit in ATM) ची सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. NPCI च्या मते, नॅशनल फायनान्शिअल स्विचच्या माध्यमातून कॅश डिपॉझिटची सेवा सुरू होणार आहे. यामध्ये ATM ऑपरेटर्सना ATM मधल्या पैशांचही व्यवस्थापन करता येणार आहे. तसंच सारखेसारखे बँकेच पैसे जमा करण्यातूही सुटका होणार आहे. कॅश डिपॉझिटच्या सुविधेनंतर ग्राहकांनी जमा केलेल्या पैशातून यंत्रणा कार्यान्वित करता येणार आहे. ही यंत्रणा पैसे काढण्यासाठीही वापरू शकतात. यामुळे ATM मध्ये कॅश भरण्याची चिंता उरणार नाही.
एका खाजगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, सगळ्या खाजगी आणि सार्वजनिक बँकांना इंटरऑपरेबल नेटवर्कमध्ये जोडलं जाणार असले तरी याला होकार देण्याआधी बँकांना काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण या माध्यमातून बनावट नोटांचं मोठं आव्हान समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यत येत आहे.