Categories: अर्थ/उद्योग बातम्या सामाजिक

टपाल खात्याच्या ‘या’ नऊ योजनांमध्ये करा गुंतवणुक; मिळेल आयुष्यभरासाठी भरघोस उत्पन्न

नवी दिल्ली | प्रत्येक भारतीयाला पोस्ट खाते (Indian Post Office) आणि त्याची विश्वासार्हता माहिती आहे. पोस्ट खाते सरकारच्या अखत्यारित असल्याने गुंतवणूकदारांच्या पैशांचीही हमी मिळते. विशेष म्हणजे पोस्टात कोणत्याही भारतीयाला वेगवेगळ्या सरकारी योजनांतर्गत खाती उघडता येतात. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत पोस्ट खात्याच्या योजना असून  गुंतवणुकदारांना चांगलं व्याजही मिळवून देतात. पोस्ट खाते बचत खात्यावर ४ टक्क्यांपासून ७.४ टक्क्यांपर्यंत व्याज देते. या योजनांमध्ये प्रामुख्याने पोस्ट ऑफिस बचत खाते, मुदत ठेव खाते, रिकरिंग खाते, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना, पंधरा वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खाते(पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र (केवीपी) आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा  समावेश आहे.

१. पोस्ट ऑफिस बचत खाते –
हे बचत खाते पोस्ट ऑफिसमध्ये आपण कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत उघडलेल्या बँक खात्यासारखे कार्य करते. एटीएम कार्ड, चेकबुक, इ बॅंकिग, मोबाईल बॅंकीग या सुविधाही या खात्याअंतर्गत मिळतात. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज खाते स्वतंत्र किंवा संयुक्त खात्यावर ४ टक्के व्याज दर देते. बचतीच्या ठेवीवरील व्याज दर प्रत्येक जून तिमाहीनंतर बदलत राहतात. या खात्यात कलम ८० सी अंतर्गत १०,००० पर्यंतच्या व्याज रकमेस सूट देण्यात आली आहे. खात्यात किमान ५०० रुपये शिल्लक ठेवावे लागतात. 

२. पंचवार्षिक पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते (आरडी) –
पोस्टात १०० रूपये प्रतिमहिना इतक्या कमी रक्कमेवर सुध्दा आरडी खाते काढता येते. या खात्यावर व्याज दर ५.८ टक्के आहे. पोस्ट ऑफिसचे आरडी खाते अल्पवयीन मुलांच्या नावे देखील उघडले जाऊ शकते आणि १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे अल्पवयीन हे खाते उघडून ऑपरेट करू शकतात. एका वर्षा नंतर ५० टक्के शिल्लक रक्कम काढण्याची परवानगी या खात्यात आहे.

३. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खाते (टीडी) – 
सध्या टर्म डिपॉझिट (टीडी) चे व्याज दर वार्षिक ५.५ ते ६.७ टक्के आहेत. या खात्यात एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षासाठी गुंतवणूक करता येते. ही गुंतवणुक करांच्या लाभास पात्र आहे. (कलम ८० सी या आयकर कायद्याअंतर्गत करसवलत) योजनेत १०० रूपये किमान गुंतवणुक मर्यादा असून कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

४. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (एमआयएस) –
पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट रकमेची गुंतवणूक करते आणि त्याला व्याज स्वरूपात मासिक उत्पन्न मिळवून देते. या योजनेअंतर्गत, मासिक आधारावर देय व्याज (ठेवीच्या तारखेपासून) आपल्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात जमा केले जाते. पोस्ट ऑफिस एमआयएस खात्यावर सध्याचा व्याज दर ६.६ टक्के आहे. या योजनेतील गुंतवणूकीसाठी कोणतेही आयकर सवलतीचे लाभ उपलब्ध नाहीत. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा मुदतपूर्ती कालावधी ५ वर्षांचा आहे. कमाल गुंतवणुक वैयक्तिक खात्यासाठी ४.५ लाख तर जॉईंट खात्यासाठी ९ लाख आहे.

५. वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) –
भारतातील ज्येष्ठ नागरिकांना समर्पित केलेली ही विशेष योजना आहे. सध्या या योजनेत दरवर्षी ७.४ टक्के व्याज मिळत आहे. ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती वरिष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडू शकते. एससीएसएसचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असून ३ वर्षांसाठी वाढवता येतो. योजनेतील कमाल रक्कम १५ लाखांपेक्षा जास्त नसावी. किमान गुंतवणुक १००० रूपये आहे. या योजनेचा व्याज दर सरकारने प्रत्येक जून तिमाहीनंतर कायम ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेवरील व्याज दर तिमाही भरला जातो. या योजनेतील गुंतवणूकीची रक्कम कलम ८० सी नुसार वजा केली जाईल आणि मिळणारे व्याज करपात्र आहे आणि ते टीडीएसच्या अधीन आहे. 

६. पंधरा वर्षांचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (पीपीएफ) –
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. या खात्यात किमान ५०० रूपये आणि कमाल १.५ लाख जमा करून खाते उघडता येते. शिवाय, गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा मिळते आणि ते अंशतः पैसे काढू शकतात. या योजनेसाठी सध्या मिळणारा व्याज दर हा वार्षिक ७.६ टक्के आहे. हे खाते १५ वर्षांच्या मुदतीसाठी उघडता येते. आर्थिक वर्षातील गुंतवणुक १.५ लाखापर्यंत करसवलतीस पात्र आहे. 

७. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी)
एनएससी ही योजना भारत सरकारने बचत करण्याच्या सवयीला चालना देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेसाठी किमान गुंतवणूकीची रक्कम १०० रूपये आहे आणि कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूकीसाठी मर्यादा नाही. या योजनेचा व्याज दर प्रत्येक वर्षी बदलतो. सध्या या योजनेतून ७.० टक्के पर्यंत व्याज परतावा मिळत असून पूर्वी ७.६ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत होते. केवळ भारतातील रहिवासीच या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.

८. किसान विकास पत्र (केव्हीपी) –
किसान विकास पत्र लोकांना दीर्घ मुदतीच्या बचत योजनेत गुंतवणूकीची सुविधा देते. या योजनेत सध्याचा व्याज दर वार्षिक ६.९ टक्के असून गुंतवणुक कालावधी १२४ महिने इतका आहे. या कालावधीत गुंतवलेली रक्कम हमखास दुप्पट होते. या योजनेत १००० रूपयांपासून गुंतवणुक करता येत असून कमाल गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. व्याज दर दरवर्षी बदलू शकतात. यापूर्वीचा सर्वोत्तम व्याजदर ७.६ टक्के राहिला आहे. यासाठी वैयक्तिक किंवा जॉईंट खाते उघडता येते. 

९. सुकन्या समृद्धि योजना (एसएसवायसी) 
आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने सुकन्या समृद्धि योजना सुरू केली आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सुरू केली होती. या योजनेचे लक्ष्य अल्पवयीन मुलींसाठी आहे. दहा वर्ष होण्यापूर्वी मुलीच्या जन्मापासून केव्हाही सुकन्या समृध्दी योजनेत खाते उघडता येते. या योजनेसाठी किमान गुंतवणूकीची रक्कम दर वर्षी रू २५० ते कमाल १.५ लाख इतकी आहे. ही योजना उघडल्यापासून २१ वर्षांसाठी कार्यरत आहे. या योजनेतून मिळणारा व्याज परतावा सध्याच्या घडीला ७.६ टक्के इतका आहे. 

Team Lokshahi News