नवी दिल्ली | भारत-चीन संबंध ताणले गेल्याने चायनीज वस्तूंना विरोध वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने व्हिव्हो या चायनीज मोबाईल कंपनीसोबतचा करार स्थगित केला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक काढत याची अधिकृत माहिती दिली आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा युएईत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
व्हिव्होने २०१८ साली पुढील ५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला २१९० कोटी रुपये टायटल स्पॉन्सरशिपसाठी दिले होते. हा करार २०२२ मध्ये संपणार होता. या करारांतर्गत व्हिव्हो बीसीसीआयला दरवर्षी ४४० कोटी रुपये देत असे. मात्र गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झाले असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी चायनीज मोबाईल कंपनीची टायटल स्पॉन्सरशिप कायम ठेवणे चाहत्यांना रुचले नाही. बीसीसीआयनेही विवो कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी व्हिव्होसोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
नव्या कराराची शक्यता –
बीसीसीआय यावर्षी नवीन टायटल स्पॉन्सरशिपसाठी निविदा काढणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल आणि व्हिव्होमध्ये येत्या वर्षात २०२१ ते २०२३ पर्यंत नवा करार होऊ शकतो.