Categories: Featured गुन्हे प्रशासकीय सामाजिक

Lockdown : बेशिस्त वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा

मुंबई। राज्यातील कोरोनाबाधितांची आणि मृत्यु पावत असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारची चिंता वाढू लागलीय. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात येत आहे. त्यामुळे जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा सज्जड इशारा अजित पवार यांनी दिला आहे.  

कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, मात्र काही विनाकारण प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहेत. अशांची यापुढे गय केली जाणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

इटली, अमेरिका, स्पेनमधील कोरोना विषाणू संसर्ग बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, आरोग्यसेविका, पोलिस, सफाई कामगार यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावे. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Team Lokshahi News