Categories: Featured

रेशनवरील धान्य खरेदीसाठीचा ‘तो’ फॉर्म खरा की खोटा? अन्न, नागरी पुरवठा विभागाने केला खुलासा…

मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशनवरील धान्य खरेदीसाठी एक फॉर्म प्रसिध्द केल्याची पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. परंतु रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे की, सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Team Lokshahi News